रशियात पुन्हा मोठी खळबळ; मॉक्सोत भरदिवसा लेफ्टनंट जनरलची हत्या, पुतिनच्या खास माणसाचा स्फोटात मृत्यू

Russia News | रशियन लेफ्टनंट जनरल यारोस्लाव मोस्कलिक यांचा शुक्रवारी बालाशिखा शहरात एका कार बॉम्बस्फोटात हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. लेफ्टनंट जनरल यारोस्लाव मोस्कालिक रशियन सैन्याच्या जनरल स्टाफच्या मुख्य ऑपरेशन्स डायरेक्टरेटचे उपप्रमुख होते.
रशियन तपास समितीने त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली असून हा स्फोट रिमोट बॉम्बने घडवला असल्याचे सांगण्यात आले आहे. रशियन तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हा स्फोट रिमोट बॉम्बने घडवला गेला. तो एका उभ्या असलेल्या कारमध्ये ठेवण्यात आला होता. हा स्फोट तीक्ष्ण धातूच्या तुकड्यांनी भरलेल्या आयईडीमुळे (IED) झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे हा हल्ला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांच्यासोबत क्रेमलिनमध्ये बैठक सुरू असताना घडला आहे. दरम्यान, अद्याप या बॉम्बस्फोटाची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली नाही. Russia News |
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात युक्रेनमधील युद्ध संपवणे हे आपले प्राधान्य बनवले आहे. त्यांनी माध्यमांना ‘पुढील काही दिवस खूप महत्त्वाचे असणार आहेत. सध्या बैठका सुरू आहेत. आपण एक करार करणार आहोत आणि मला वाटते की आपण खूप जवळ पोहोचलो आहोत.’ एकीकडे शांतता वार्ता सुरू असतानाच मोस्कालिक यांची हत्या झाल्याने आता तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.





