हगवणे कुटुंबाचा आणखी एक कारनामा उघड; चित्रपट दिग्दर्शकाला धमकावल्याचा आरोप

पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर हगवणे कुटुंबीयांचे अनेक कारनामे समोर येत आहेत. सुनेचा छळ, धमक्या, फसवणूक यांसह आता चित्रपट दिग्दर्शकाला धमकावल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. राजेंद्र हगवणे यांचा पुतण्या संतोष हगवणे याने ‘खुर्ची’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाचे दिग्दर्शक अविनाश खोचरे पाटील यांनी हगवणे यांनी लाखो रुपये थकवल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे, चित्रपटाचे पोस्टर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लॉन्च झाले होते.
अविनाश पाटील यांना हगवणे यांच्याकडून सातत्याने धमक्या मिळत होत्या. संतोष हगवणेने पिस्तूल दाखवत मामा जालिंदर सुपेकर यांच्या पोलीस खात्यातील वजनाचा दबाव टाकला. पाटील यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह पुणे पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली, पण कारवाई झाली नाही.
दरम्यान, जालिंदर सुपेकर यांची पुण्यातील कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक पदावरून उपमहासमादेशक, होमगार्ड, मुंबई येथे बदली झाली. हगवणे बंधूंना खोटा पत्ता देऊन शस्त्र परवाना मिळवून देण्याच्या आरोपात सुपेकर यांचे नाव असल्याचा आरोप आहे. या प्रकरणाने पुणे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.





