हगवणे कुटुंबाच्या अडचणीत वाढ! जेसीबी खरेदी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर

Vaishnavi Hagavane suicide case वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात हगवणे कुटुंब तुरुंगात आहे. पैशांसाठी सुनेचा छळ केल्याचा आरोप या कुटुंबावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहे. खेड तालुक्यातील निगोजे गावच्या प्रशांत येळवंडे यांनी लता राजेंद्र हगवणे व शशांक हगवणे यांच्याकडून जेसीबी खरेदी प्रकरणात फसवणूक झाली असल्याची तक्रार दिली होती. आता या प्रकरणात एक मोठा ट्वीस्ट आला असून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मार्च 2022 मध्ये प्रशांत येळवंडे यांनी लता हगवणे आणि शशांक हगवणे यांच्यासमवेत 25 लाख रुपयांचा जेसीबी खरेदीचा व्यवहार केला. व्यवहारानुसार, प्रशांत यांनी 5 लाख रुपये देऊन जेसीबी ताब्यात घेतला. जेसीबीवर इंडसइंड बँकेचे 19 लाखांचे कर्ज असल्याने, कर्जाचे हप्ते भरण्यासाठी प्रशांत यांनी दरमहा 50 हजार रुपये हगवणे यांना देण्याचे ठरले. त्यानुसार, प्रशांत यांनी लता हगवणे यांच्या खात्यात 6 लाख 70 हजार रुपये जमा केले.
बँकेचे अधिकारी भासवून फसवणूक
मात्र, शशांक याने बँकेचा हप्ता थकवल्यामुळे हा जेसीबी बँकेने जप्त केला व तो नंतर शशांक याने सोडवल्याची माहिती समोर आली होती. ज्यांनी हा जेसीबी जप्त केला, ते कोणी बँकेचे अधिकारी नसून तोतया होते, असं पोलीस तपासात समोर आले आहे. आपण बँकेचे अधिकारी असल्याचे भासवत या तिघांनी जबरदस्तीने प्रशांत येळवडे यांच्या ताब्यातील जेसीबी मशीन जप्त केले होते.
पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली असून, आज पहाटेच्या सुमारास अटकेची कारवाई करण्यात आली आहे. योगेश राजेंद्र रासकर (वय २५, रा. तळेगाव ढमढेरे), गणेश रमेश पोतले (वय ३०, रा. मोहितेवाडी), वैभव मोहन पिंगळे (वय २७, रा. तळेगाव ढमढेरे) अशी या प्रकरणातील तोतया बँक अधिकाऱ्यांची नावं आहेत. त्यामुळे पोलिसांनी या तिघांना अटक केली आहे. या तिघांविरोधात फसवणूक, गैरवर्तन व बनावट ओळख सादर करून अनधिकृत ताबा मिळविल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
मार्च 2022 मध्ये प्रशांत येळवंडे यांनी लता हगवणे आणि शशांक हगवणे यांच्यासमवेत 25 लाख रुपयांचा जेसीबी खरेदीचा व्यवहार केला. व्यवहारानुसार, प्रशांत यांनी 5 लाख रुपये देऊन जेसीबी ताब्यात घेतला. जेसीबीवर इंडसइंड बँकेचे 19 लाखांचे कर्ज असल्याने, कर्जाचे हप्ते भरण्यासाठी प्रशांत यांनी दरमहा 50 हजार रुपये हगवणे यांना देण्याचे ठरले. त्यानुसार, प्रशांत यांनी लता हगवणे यांच्या खात्यात 6 लाख 70 हजार रुपये जमा केले.
मात्र, हगवणे यांनी ही रक्कम स्वतःसाठी वापरली आणि बँकेचे हप्ते भरले नाहीत. परिणामी, ऑगस्ट 2024 मध्ये इंडसइंड बँकेने जेसीबी प्रशांत यांच्याकडून जप्त केला. नंतर हगवणे यांनी जेसीबी बँकेकडून सोडवला, पण प्रशांत यांना परत दिला नाही. त्यामुळे प्रशांत येळवंडे त्यांचे 11 लाख 70 हजार रुपये किंवा जेसीबी परत मिळवण्यासाठी हगवणे यांच्याकडे पाठपुरावा करत होते. पण त्यांना दाद मिळाली नाही. उलट प्रशांत येळवंडे यांनाचा धमकी देण्यात आली असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.