Vaishnavi Hagavane death case : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात हगवणे कुटुंब तुरुंगात आहे. पैशांसाठी सुनेचा छळ केल्याचा आरोप या कुटुंबावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहे. आता बाप लेकांच्या विरोधात एका व्यक्तीने फसवणुकीची तक्रार दिल्याची माहिती समोर आली आहे. खेड तालुक्यातील निगोजे गावच्या प्रशांत येळवंडे यांनी लता राजेंद्र हगवणे व शशांक हगवणे यांच्याकडून जेसीबी खरेदी प्रकरणात फसवणूक झाली असल्याची तक्रार दिली आहे. नेमकं काय आहे प्रकरण? मार्च 2022 मध्ये प्रशांत येळवंडे यांनी लता हगवणे आणि शशांक हगवणे यांच्यासमवेत 24 लाख रुपयांचा जेसीबी खरेदीचा व्यवहार केला. व्यवहारानुसार, प्रशांत यांनी 5 लाख रुपये देऊन जेसीबी ताब्यात घेतला. जेसीबीवर इंडसइंड बँकेचे 19 लाखांचे कर्ज असल्याने, कर्जाचे हप्ते भरण्यासाठी प्रशांत यांनी दरमहा 50 हजार रुपये हगवणे यांना देण्याचे ठरले. त्यानुसार, प्रशांत यांनी लता हगवणे यांच्या खात्यात 6 लाख 70 हजार रुपये जमा केले. मात्र, हगवणे यांनी ही रक्कम स्वतःसाठी वापरली आणि बँकेचे हप्ते भरले नाहीत. परिणामी, ऑगस्ट 2024 मध्ये इंडसइंड बँकेने जेसीबी प्रशांत यांच्याकडून जप्त केला. नंतर हगवणे यांनी जेसीबी बँकेकडून सोडवला, पण प्रशांत यांना परत दिला नाही. त्यामुळे प्रशांत येळवंडे त्यांचे 11 लाख 70 हजार रुपये किंवा जेसीबी परत मिळवण्यासाठी हगवणे यांच्याकडे पाठपुरावा करत होते. पण त्यांना दाद मिळाली नाही. उलट प्रशांत येळवंडे यांनाचा धमकी देण्यात आली असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. चर्चा करण्यासाठी गेले अन्… प्रशांत येळवंडे हे यासंबंधी चर्चा करण्यासाठी गेले असता शशांक हगवणे यांनी पिस्तुल हातात ठेवून ‘तू मशीन 14 महिने वापरली आहे, आता पैसे मागू नको नाही तर घरचे नीट राहणार नाहीत’, अशी धमकी त्यांना दिली होती. त्यानंतर कोणतीही दाद न मिळाल्याने त्यांनी महांगुळे एमआयडीसी पोलिसांत तक्रार दिली असून, गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. हेही वाचा: Pune Crime News : हडपसरमध्ये हवेत गोळीबार; मस्तीचा चेंडू भावाच्या खांद्यात आरपार घुसला !