पुणेकरांची चिंता कायम! शहरात करोनाने आणखी 39 मृत्यू

पुणे – शहरात मागील चार दिवसांपासून नमुने तपासणीची संख्या कमी झाल्यामुळे दररोजची नव्या करोना बाधितांची संख्याही कमी झाल्याचे दिसून येते. शनिवारी दिवसभरात 1,658 नवीन बाधित सापडले आहेत. तर 1 हजार 248 बाधित करोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, गेल्या 24 तासांत करोनामुळे 59 जणांचा मृत्यू झाला असून, त्यातील शहर हद्दीतील 39 तर अन्य जिल्ह्यांतील 20 जणांचा समावेश आहे.
शहरात गेल्या चार दिवसांपासून सात ते साडेसात हजारांपर्यंत दररोज होणारी नमुने तपासणी संख्या साडेपाच ते सहा हजारांपर्यंत खाली आहे. जवळपास एक ते दीड हजारांनी तपासणी संख्या कमी झाली आहे. शनिवारी (दि. 19) दिवसभरात 5 हजार 919 संशयितांची तपासणी करण्यात आली.
आतापर्यंत तब्बल 5 लाख 68 हजार 865 संशयितांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये 1 लाख 30 हजार 81 जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यातील 1 लाख 9 हजार 371 बाधित बरे होऊन घरी गेले आहेत. शहरात सध्या 17 हजार 664 बाधित सक्रिय असून, त्यातील 957 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
सध्या 495 बाधितांना व्हेंटिलेटर लावण्यात आला आहे, तर 462 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.





