पुणे – यंदाच्या दसऱ्याच्या मुहुर्तावर नव्याने 10 हजार 872 वाहने आणि 932 ई-वाहनांच्या आरटीओकडे नोंदी झाल्या. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून शहर-उपनगरांतील शोरुमला वाहन खरेदीसाठी गर्दी दिसून आली. दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी सोने-चांदी, विविध वस्तू, कपडे यासह वाहन खरेदी तेजीत असते. दरवर्षी वाहन खरेदीची संख्या ही वाढलेलीच असल्याचे दिसून येते. यंदा दसऱ्याच्या मुहुर्तावर 6 हजार 419 दुचाकी तर 3 हजार 531 चारचाकी वाहनांच्या नोंदी झाल्या. तसेच रिक्षा, बस, टॅक्सी आणि मालवाहतूक (गुड्स) वाहनांचीही खरेदी झाली. टॅक्सीच्या खरेदीमध्येही वाढ दिसून आली, अशी माहिती पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून देण्यात आली. ई-बाइकला वाढतोय प्रतिसाद गतवर्षी दसऱ्याच्या मुहुर्तावर 925 ई-वाहनांची खरेदी झाली होती. तर यंदा 932 वाहनांची खरेदी झाली. त्यामध्ये गतवर्षीच्या तुलनेत ई-कारच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. 2022 मध्ये 57 ई-कार खरेदी झाल्या तर यंदा 113 ई-कार खरेदी झाल्याची नोंद आहे. दुचाकी गतवर्षी 862 तर यावर्षी 811 आणि गुड्स वाहने गतवर्षी 5 तर यंदा 7 वाहनांची खरेदी झाली. ई-वाहनांच्या किंमती जास्त असल्याने केवळ एक रिक्षाची नोंद झाली तर बस आणि टॅक्सी खरेदीची नोंद झालेली नाही.