‘अण्णासाहेब पाटील महामंडळाला निधीची कमतरता भासू देणार नाही’ – अजित पवार

नागपूर – समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देत महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास करण्याची सरकारची भूमीका आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना समाजातील गरजू लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी आज दिली.
नागपूर विधान भवनातील उपमुख्यमंत्री कार्यालयात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या लोगोचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज अनावरण करण्यात आले. यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार अतुल भातखळकर, प्रमोद हिंदुराव उपस्थित होते.
अजित पवार पुढे म्हणाले, समाजाच्या उन्नत्तीसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजना समाजाच्या गरजू लाभार्थ्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न करा. एकही पात्र लाभार्थी योजनेपासून वंचित राहू नये याची काळजी घेण्याच्या सूचना सुद्धा त्यांनी यावेळी दिल्या.
एक लाख मराठा उद्योजक घडविणार
अण्णसाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजातील युवकांना सबसिडी देण्याची योजना राबविण्यात आली होती. आतापर्यंत त्या योजनेचा ७२ हजार मराठ्यांनी लाभ घेतला असून ५७०० कोटींचे कर्जचवाटप झाले आहे.
राज्य सरकारने महामंडळाच्या माध्यमातून ६०० कोटींचा व्याज परतावा दिला आहे. भविष्यात मराठा समाजाचे १ लाख उद्योजक घडविण्याचा मानस आहे, अशी घोषणा अण्णसाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केली.





