Anna Hazare : माहिती अधिकार कायद्याची गळचेपी सहन करणार नाही; अण्णा हजारेंचा थेट राज्य सरकारला इशारा
Anna Hazare : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्य सरकारविरोधात पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

Anna Hazare : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्य सरकारला थेट इशारा देत 5 जुलैपासून आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली आहे. माहिती अधिकार (RTI) कायद्यात राज्य सरकारने केलेल्या नव्या नियमांविरोधात त्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, हे बदल तातडीने मागे न घेतल्यास राळेगणसिद्धी येथे बेमुदत उपोषण सुरू करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. (Anna Hazare)
अण्णा हजारे यांनी सांगितले की, 12 जून 2026 रोजी लागू करण्यात आलेल्या RTI नियमांमुळे माहितीचा अधिकार कमकुवत झाला आहे. माहितीच्या प्रतींसाठी वाढवलेले शुल्क, ओळखपत्राची सक्ती आणि “एक विषय-एक अर्ज” यांसारख्या तरतुदींमुळे सामान्य नागरिकांना माहिती मिळवणे अधिक कठीण होणार असल्याचा त्यांनी आरोप केला. (Anna Hazare)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून हे नियम तातडीने रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच, मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांच्यासोबत चर्चा झाल्याचे सांगत, दोन दिवसांत सकारात्मक निर्णय न झाल्यास 5 जुलैपासून राळेगणसिद्धीतील यादव बाबा मंदिरात आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Anna Hazare)
फुटीर खासदारांवरही संताप
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अण्णा हजारे यांनी त्यांच्यावरही कडक शब्दांत टीका केली. अशा पद्धतीने पक्ष बदल करणे योग्य नाही. ज्याच्याकडे ध्येयवाद आणि समाजासाठी काम करण्याची भावना असते, तो पक्ष बदलत नाही. स्वतःचे हित साधणारेच दलबदल करतात, असे अण्णा हजारे म्हणाले. (Anna Hazare)
अण्णा हजारेंच्या प्रमुख मागण्या
माहिती अधिकारातील 12 जून 2026 चे नवे नियम रद्द करावेत.
माहितीच्या प्रतींसाठी करण्यात आलेली शुल्कवाढ मागे घ्यावी.
ओळखपत्राची सक्ती आणि “एक विषय-एक अर्ज” नियम रद्द करावा.
माहितीचा अधिकार अधिक प्रभावी आणि नागरिकाभिमुख ठेवावा.






