Anil Deshmukh on NCP Crisis : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी काल एक मोठं वक्तव्य केले. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र यावेत ही अनेकांची इच्छा आहे. त्यानुसार, तो निर्णय सुप्रिया सुळे घेतील असं शरद पवारांनी स्पष्ट केले. त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशातच आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवर राज्याचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, राष्ट्रवादीचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येतील, ही चर्चा फक्त मिडियामध्येच सुरू आहे. प्रत्यक्षात राजकीय पातळीवर अशा कोणत्याही चर्चेला सुरुवात झालेली नाही, असं अनिल देशमुख म्हणाले. तसेच अनिल देशमुख यांना ‘तुमच्या मनात काय आहे?’ असे विचारले असता ते म्हणाले की, आमच्या पक्षात अशा कोणत्याही चर्चेला वाव नाही. आम्ही वेळ आल्यावर वरिष्ठांशी याबाबत बोलू, असं त्यांनी म्हटले. मात्र, पत्रकारांनी ‘तुमच्या मनात नेमकं काय आहे?’ असा प्रश्न पुन्हा विचारताच अनिल देशमुख मिश्कीलपणे म्हणाले की, जवळ या तुमच्या कानात सांगतो.. त्यांच्या या उत्तराने एकच हशा पिकला. अजित पवारांनी राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता फेटाळली दरम्यान, अजित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गळती लागण्याची शक्यता असल्याने दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात चर्चा केली जात आहे, असं अजित पवारांनी म्हटलं आहे. तसेच आगामी काळातील पक्षातील गळती थांबवण्याच्या अनुषंगाने शरद पवारांकडून वक्तव्य आली असतील अशी माहिती देखील अजित पवारांनी दिली आहे.