Satara: करंजेत संतप्त महिलांचा ‘रास्ता रोको’
Satara महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून रात्री दोन ते पहाटे पाच या वेळेत पाणी सोडले जात असल्याने नागरिकांची, विशेषतः महिलांची मोठी गैरसोय होत आहे. रात्रीच्या वेळी पाणी भरण्यासाठी जागे राहावे लागत असल्याने महिलांच्या आरोग्यावरही प्रतिकूल परिणाम होत असल्याची तक्रार आंदोलकांनी केली.

Satara: करंजे भागातील पाणीटंचाईने संतप्त झालेल्या महिलांनी शुक्रवारी सकाळी रस्त्यावर उतरुन प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. किर्दत आळी, इंदलकर आळी आणि चांभार आळी परिसरात नियमित व पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने महिलांनी करंजे गावठाणाच्या कमानीजवळ रास्ता रोको आंदोलन केले. ‘आम्हाला पाणी द्या अन्यथा येथून हटणार नाही,’ असा आक्रमक पवित्रा घेत महिलांनी करंजे नाका रोखून धरल्याने सुमारे तासभर वाहतुकीची कोंडी झाली. मोळाच्या ओढ्यावरुन साताऱ्याकडे येणाऱ्या वाहनांच्या रांगा लागल्या, तर आंदोलनस्थळी पालिका प्रशासन आणि पोलिसांची धावपळ उडाली.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून रात्री दोन ते पहाटे पाच या वेळेत पाणी सोडले जात असल्याने नागरिकांची, विशेषतः महिलांची मोठी गैरसोय होत आहे. रात्रीच्या वेळी पाणी भरण्यासाठी जागे राहावे लागत असल्याने महिलांच्या आरोग्यावरही प्रतिकूल परिणाम होत असल्याची तक्रार आंदोलकांनी केली. दिवसभराच्या कामांबरोबरच पाणी भरण्यासाठी रात्रीची जागरणे करायची, असा सवाल करत महिलांनी प्रशासनाला धारेवर धरले. आंदोलक महिलांनी रस्त्यावर मानवी साखळी तयार केली. पाण्याची भांडी रस्त्यावर मांडून त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. करंजे भागाला पाणी देण्याची आश्वासने निवडणुकीच्या वेळी दिली जातात. मात्र, प्रत्यक्षात प्रश्न सुटत नाही, असे महिलांनी सांगितले. अनेक नगरसेवक निवडून आले, तरी पाणीटंचाई कायम असेल आणि नागरिकांना मूलभूत सुविधाच मिळणार नसतील, तर लोकप्रतिनिधींचा उपयोग काय, असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला.
स्थानिक नगरसेवक रविराज किर्दत यांनी आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिला आपल्या मागण्यांवर ठाम होत्या. पाणीपुरवठा विभागाचे अभियंता शहाजी वाठारे प्रकृती अस्वास्थ्यामुळे रजेवर होते. तर दुसरे अधिकारी संदीप सावंत एसआयआर मोहिमेच्या कामात व्यस्त असल्याने पाणीपुरवठा विभागाचा प्रमुख अधिकारी घटनास्थळी उपस्थित राहू शकले नाहीत.
दरम्यान, पाणीपुरवठा सभापती तथा उपनगराध्यक्ष ॲड. दत्ता बनकर यांनी वाहतूक विभागाला सूचना देत टँकरने पाणीपुरवठा करण्याबाबत कार्यवाही करण्यास सांगितले. प्रशासनातील काही अधिकारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी महिलांशी चर्चा केली. पोलिसांनीही आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर महिलांनी रास्ता रोको मागे घेतला. मात्र, करंजेतील पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार का, असा प्रश्न या आंदोलनानंतर उपस्थित झाला आहे.





