Satara: सातार्याच्या आठवणीतला ‘नाना’ : पडद्यावर बाहुबली, प्रत्यक्षात आपलासा माणूस
Satara सातार्यातील हॉटेल महाराजा किंवा सदरबाजारातील ऑफिसर्स क्लबमध्ये ते अनेकदा निवांत बसलेले आढळायचे. पत्रकार भेटले की औपचारिक मुलाखतीचा आव न आणता ते थेट गप्पांमध्ये रमायचे. विषय चित्रपटापुरता मर्यादित नसायचा. मराठी रंगभूमी, तिचे बदलते स्वरूप, कलाकारांचे जगणे, अभिनयातील बदल अशा विषयांवर ते मनापासून बोलायचे.

Satara: पडद्यावर डोळ्यांत अंगार घेऊन उभा राहणारा अभिनेता… संवादातून समोरच्याच्या काळजात धडकी भरवणारा कलाकार… पण कॅमेर्याची नजर दूर गेली की अगदी साध्या पेहरावात, पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा मारणारा आणि वेळ मिळाला की कॅरमचा डाव मांडून आजूबाजूचे वातावरण हलकेफुलके करणारा माणूस… हा विरोधाभास म्हणजेच नाना पाटेकर!
नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी आज सातार्यात पोहोचली आणि तब्बल दोन दशकांपूर्वीच्या त्यांच्या आठवणींना अचानक उजाळा मिळाला. वर्ष होते 2005. दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या ‘अपहरण’ चित्रपटाचे सुमारे पंधरा दिवसांचे शूटिंग सातार्यात सुरू होते. या चित्रपटात नाना पाटेकर यांनी तबरेज आलम या खतरनाक बाहुबलीची भूमिका साकारली होती. अजय देवगण, बिपाशा बसू, अपूर्व लखिया यांसारख्या कलाकारांच्या उपस्थितीने सातार्यातील त्या दिवसांना वेगळेच ग्लॅमर लाभले होते.रुपेरी झगमगाटातही नाना वेगळे दिसायचे.
सातार्यातील हॉटेल महाराजा किंवा सदरबाजारातील ऑफिसर्स क्लबमध्ये ते अनेकदा निवांत बसलेले आढळायचे. पत्रकार भेटले की औपचारिक मुलाखतीचा आव न आणता ते थेट गप्पांमध्ये रमायचे. विषय चित्रपटापुरता मर्यादित नसायचा. मराठी रंगभूमी, तिचे बदलते स्वरूप, कलाकारांचे जगणे, अभिनयातील बदल अशा विषयांवर ते मनापासून बोलायचे.
नानांच्या आजूबाजूला त्या काळात चित्रपटातील नामवंत कलाकार असोत किंवा त्यांना भेटण्यासाठी आलेला एखादा सामान्य माणूस… नानांच्या वागण्यात फारसा फरक नसायचा. कॅरमचा डाव मांडला की काही क्षणांसाठी सेटवरील ताण, धावपळ आणि अभिनयाचे जग बाजूला पडायचे. नाना हसत-खेळत वातावरणात रंगून जायचे.
पडद्यावरचा ‘तबरेज आलम’ आणि प्रत्यक्षातील नाना यांच्यात जमीन-अस्मानाचा फरक होता. अभिनय करताना एखाद्या व्यक्तिरेखेत इतके खोलवर उतरायचे की तो माणूस नाना नसून खरोखरच तोच व्यक्तिरेखा आहे, असे वाटावे. त्यामुळे नाना म्हणजे केवळ अभिनेता नव्हते; ते अभिनयाची चालती-बोलती कार्यशाळा होते. पण चित्रीकरण संपले, चेहर्यावरचा रंग उतरला की समोर उभा राहायचा तो अगदी आपल्यासारखा साधा माणूस.
सातार्याशी नानांचे नाते एवढ्यावरच थांबले नाही. 2015 मध्ये भुईंज येथील किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या कृषी व पुष्प प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. पुढे 2025 मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातार्यातील शेतावर झालेली त्यांची भेटही चर्चेत आली. सामाजिक कार्याच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी आणि दुष्काळग्रस्त भागांशीही त्यांचे नाते जोडले गेले.
मात्र आज या सगळ्या आठवणींपेक्षा सातार्याला आठवतो आहे तो 2005 च्या शूटिंगदरम्यानचा साधा नाना. हॉटेल महाराजातील निवांत गप्पा… ऑफिसर्स क्लबमधील कॅरमचा डाव… पत्रकारांशी मराठीत रंगलेल्या चर्चा… आणि समोरच्या माणसाला ‘स्टार’ म्हणून नव्हे, तर माणूस म्हणून दिलेली वागणूक…
आज नाना नाहीत. पडद्यावर त्यांचा आवाज पुन्हा ऐकू येणार नाही. त्यांच्या डोळ्यांतील ती धार पुन्हा दिसणार नाही. पण सातार्याच्या आठवणींच्या पडद्यावर मात्र एक नाना कायम राहतील…
चेहर्यावर रंग नसलेला, साध्या कपड्यातला, कॅरमची सोंगटी हातात घेऊन मनमोकळेपणाने हसणारा… आणि समोरच्या माणसाशी अगदी हक्काने बोलणारा आपलासा नाना. कदाचित म्हणूनच काही कलाकार पडद्यावरून उतरतात; पण काही माणसं मात्र लोकांच्या आठवणीतून कधीच उतरून जात नाहीत. नाना त्यापैकीच एक.





