Pune News | नांदण्यास नकार दिल्याने चिडलेल्या पतीकडून बायकोची हत्या..

प्रभात वृत्तसेवा
पुणे – कौटुंबिक वादातून नांदण्यास नकार दिल्याने चिडलेल्या पतीने पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करून तिचा खून केल्याची घटना लोहगाव भागात घडली. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी पतीला अटक केली. ममता प्रेम जाधव (२१, रा. काजळी तांडा, पिंपळगाव, ता. जिंतूर, जि. परभणी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पती प्रेम उत्तम जाधव (२७, रा. काजळी तांडा, पिंपळगाव, ता. जिंतूर, जि. परभणी) याला अटक करण्यात आली.
याबाबत ममताची मावशी रेश्मा रामेश्वर राठोड (२८, रा. खांदवेनगर, लोहगाव) हिने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ममता परभणी जिल्ह्यातील काजळी तांडा परिसरात राहत होती. ममताचे पती प्रेम याच्याशी सातत्याने वाद होते. सततच्या वादामुळे ममता पती प्रेमचे घर सोडून पुण्यातील लोहगाव परिसरात राहणारी मावशी रेश्मा राठोड हिच्याकडे राहण्यास आली. गेल्या काही दिवसांपासून प्रेम तिला नांदण्यासाठी आग्रह करीत होता. तिने नांदण्यास नकार दिला होता. या कारणावरून प्रेमच्या मनात राग होता.
रविवारी दुपारी प्रेम गावाहून ममताच्या मावशीच्या घरी आला. त्याने ममताला सासरी नांदायला ये, असे सांगितले. ममताने त्याला नकार दिल्यानंतर त्यांच्यात वादावादी झाली, त्यामध्ये प्रेमने खिशात लपवलेला चाकूने ममताच्या गळ्यावर वार केले. त्यानंतर तो पसार झाला. गळा चिरल्याने गंभीर जखमी अवस्थेतील ममताला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
रात्री उशिरा या प्रकरणी खुनाचा गु्न्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेला आरोपी प्रेम याला रात्री अटक करण्यात आली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शेळके तपास करीत आहेत.





