धूराचे फटाके फोडल्याने कार्ला गडावर संतप्त मधमाशांचा भाविकांवर हल्ला

कार्ला – वर्षाचा पहिला दिवस असल्याने बुधवारी (दि.१) कार्ला गडावर एकविरा देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. परंतु या गर्दीतील काही हुल्लडबाज आणि अतिउत्साही भाविकांनी धूराचे फटाके फोडल्याने गडावर असलेल्या मधमाशांच्या पोळ्याला इजा झाली आणि संतप्त मधमाशांनी गडावरील भाविकांवर हल्ला चढवला. यामुळे काहीवेळ एकच गोंधळ उडाला होता. मधमाशांच्या या हल्ल्यात काही भाविक किरकोळ जखमी झाले.
प्राप्त माहितीनुसार बुधवारी कार्ला गडावर एकविरा देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले होते. यात काही भाविक हे पालख्या घेऊन गडावर आले होते. यातील काही भाविकांनी वाद्यांचा जोरजोरात आवाज करीत रंगीत धुराचे फटाके फोडले. यातून पसरलेल्या धुरामुळे लेणीजवळ असलेल्या मधमाशांच्या पोळ्याला धक्का बसला.
पोळ्यावरील संतप्त मधमाशांनी भाविकांवर हल्ला चढवला. यामुळे गडावर काहीकाळ भाविकांची धांदल उडाली होती. भाविकांच्या या पळापळीने मधमाश्या आणखीनच पसरल्या. दुपारी साधारण साडेबाराच्या दरम्यान ही घटना घडली. सुदैवाने यात जिवितहानी झाली नाही. परंतु अनेक भाविक जखमी झालेत.
स्थानिक ग्रामस्थ व एकविरा देवस्थान ट्रस्टच्या सदस्यांनी जखमींना तत्काळ गडावरून खाली आणले आणि प्रथमोपचार केले. काही भाविकांना उपचारासाठी दवाखान्यातही हलविण्यात आले. काही कालावधीनंतर एकविरा मंदिर परिसरातील परिस्थिती पूर्ववत झाली. अतिउत्साही भाविक आणि नियोजनाचा अभावामुळे अशा घटना घडत असतात. त्यामुळे गडावर फटाका बंदीची कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणी होत आहे.





