Pimpri : वाळंज विद्यालयात हमारा विद्यालय हमारा स्वाभिमान

कार्ला : मुळशी तालुक्यातील सोनू अनाजी वाळंज माध्यमिक विद्यालय, आंबवणे येथे अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाच्या वतीने “हमारा विद्यालय हमारा स्वाभिमान” या संस्कारक्षम व प्रेरणादायी उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. शिक्षक रवींद्र सोनवणे यांनी या उपक्रमाची माहिती देत विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय भावना, अनुशासन, सामाजिक समरसता, शाळेतील साधनसंपत्तीची काळजी व नागरी कर्तव्यपालन या मूल्यांचा विकास करण्यासाठी या उपक्रमाचे महत्त्व पटवून दिले.
शाळेचे मुख्याध्यापक भटू देवरे यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांमध्ये कर्तव्यनिष्ठता, सामाजिक समर्पण, ऐक्य, जबाबदारीची जाणीव व उत्तम चरित्रनिर्मिती घडावी, या हेतूने हा उपक्रम शाळेत राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. शाळा म्हणजे विद्येचे मंदिर असून मंदिरात जाताना श्रद्धा व समर्पण आपोआप जागृत होते. त्यामुळे शिस्त, स्वच्छता, समाजसेवा, शाळेतील प्रत्येक वस्तूचे संरक्षण व उत्तम व्यवस्थापन ही मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यावर भर दिला जाईल, असे देखिल त्यांनी स्पष्ट केले.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार वाळंज, संचालिका वत्सला वाळंज, संचालक गणपत मेंगडे व सुरेश कालेकर यांनी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कुलथे यांनी केले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाळासाहेब खेडकर, राहुल आवळे, विजय दळवी, शालिनी देवरे, महादेव खेडकर, संतोष दळवी तसेच विद्यार्थीवर्गाने सक्रिय सहभाग घेतला.





