प्रभात वृत्तसेवा कामशेत – वडगाव नगरपंचायत झाल्यानंतर कामशेत जिल्हा परिषद गटाची नव्याने पुनर्रचना करण्यात आली आहे. या पुनर्रचनेत खडकाळा गटाचे विभाजन करून कामशेत गटात कार्ला गणाचा समावेश करण्यात आला आहे. परिणामी या गटाची भौगोलिक परिस्थिती पूर्णपणे बदलली असून एकीकडे शहरी भाग असलेले कामशेत, तर दुसरीकडे ग्रामीण भाग असलेला कार्ला परिसर असा या नव्या गटाचे स्वरूप दिसून येत आहे. वडगाव नगरपंचायत घोषित झाल्याने खडकाळा गटाचे क्षेत्रफळ कमी झाले. नव्या रचनेनुसार कामशेत गट आता कामशेत शहरापासून थेट कार्ला गावापर्यंत जोडला गेला आहे. या गटात शहरी-ग्रामीण मिश्र स्वरूप असून शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे ग्रामीण प्रश्न आणि विकासकामे हे मुद्दे या निवडणुकीत ठळकपणे पुढे येणार असल्याचे दिसून येत आहे. कामशेत गणात कान्हे, चिखलसे, अहिरवडे, खडकाळे, खामशेत, ताजे पिंपळोली, पाथरगाव ही गावे समाविष्ट आहेत, तर कार्ला गणात टाकवे खुर्द, शिलाटणे, मळवली, सदापूर, पाटण, बोरज, देवले, वेहरगाव, दहिवली, वाकसई, डोंगरगाव, करंडोली, वरसोली, पांगोळी, उधेवाडी ही गावे समाविष्ट झाली आहेत.नव्या रचनेसोबतच आरक्षणातील बदलामुळे अनेक इच्छुकांचे मनसुबे उधळले गेले आहेत. खडकाळा-कार्ला जिल्हा परिषद मतदारसंघ सर्वसाधारण महिला (स्त्री) प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने अनेक अनुभवी इच्छुक मागे सरकले आहेत. काही इच्छुक मात्र आपल्या पत्नींना उमेदवारी देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी करत आहेत. सोशल मीडियावरून काही ठिकाणी अप्रत्यक्षरीत्या या इच्छुकांकडून तसे संकेतही मिळत आहेत. नव्या आरक्षणामुळे गटाची स्थिती बदलली.. या वेळी मात्र परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. कामशेत गण अनुसूचित जाती प्रवर्गासाठी, तर कार्ला गण सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने उमेदवारीचा खेळ गुंतागुंतीचा बनला आहे. कामशेत गणातील काही अनुसूचित जाती प्रवर्गातील इच्छुक सक्रिय झाले असले तरी अधिकृत उमेदवाराचे नाव अद्याप जाहीर झालेले नाही. सोशल मीडियावर फारशी हालचाल दिसत नसल्याने उमेदवारीचा अंदाज बांधणे अवघड ठरत आहे. राजकीय समीकरणे गुंतागुंतीची.. मावळ तालुक्यातील या गटात प्रमुख लढत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात होण्याची शक्यता आहे. कार्ला भागात शिवसेनेचा थोड्याफार प्रमाणात प्रभाव असल्याने त्यांच्या भूमिकेलाही महत्त्व आहे. महायुती कायम राहिल्यास हा गट कोणाला मिळणार आणि जर युती तुटली तर शिवसेना कोणती भूमिका घेईल, हे सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत.