Anganwadi Workers Protest : जनगणनेच्या कामाला अंगणवाडी सेविकांचा नकार! खेड तहसील कार्यालयाबाहेर संतापाचा उद्रेक..नेमकं प्रकरण काय?
Anganwadi Workers Protest : खेड तालुक्यात जनगणना २०२६-२७ च्या कामावरून प्रशासन आणि अंगणवाडी सेविकांमध्ये जुंपली; प्रगणक नियुक्ती रद्द करण्यासाठी शेकडो महिलांचे धरणे आंदोलन.

Anganwadi Workers Protest – मानधनी अंगणवाडी सेविकांना जनगणना 2026-27 साठी प्रगणक व पर्यवेक्षक म्हणून केलेली नियुक्ती तात्काळ रद्द करावी, या मागणीसाठी खेड तहसीलदार कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात खेड तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
भारताच्या जनगणनेसाठी खेड तालुक्यात कर्मचारी अपुरे पडत असल्याने अंगणवाडी सेविकांना प्रगणक व पर्यवेक्षक म्हणून नियुक्तीचे आदेश तहसीलदार कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. तसेच प्रशिक्षणासाठी उपस्थित राहण्याच्या नोटीसाही देण्यात आल्या आहेत. मात्र, योजनेव्यतिरिक्त कोणतेही अतिरिक्त काम देऊ नये, अशी भूमिका घेत अंगणवाडी सेविकांनी या आदेशाला सामूहिक विरोध दर्शवला आहे.
तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी प्रशिक्षणास गैरहजर राहणार्या कर्मचार्यांवर जनगणना अधिनियम 1948 च्या कलम 11 नुसार फौजदारी व दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देणारे पत्र 30 एप्रिल रोजी दिल्यानंतर आंदोलनाला अधिक तीव्र स्वरूप आले. अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने पल्स पोलिओ मोहिमेव्यतिरिक्त अंगणवाडी सेविकांकडून इतर कामे घेऊ नयेत, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
तरीही खेड तालुक्यात जनगणनेसाठी नियुक्ती करून सेविकांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. प्रशासन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करीत असल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य कृती समितीचे निमंत्रक निलेश दातखिळे आणि कॉम्रेड शुभा शमीम यांनी केले. यावेळी किसान महासभेचे कॉम्रेड महेंद्र थोरात, तालुका निमंत्रक आरती थिगळे, दिपाली ठाकूर, सोनाली पावडे, सारिका थोरवे, माया राक्षे, अश्विनी कुटे, सुरेखा वाडेकर, अपर्णा वाघुले यांच्यासह मोठ्या संख्येने अंगणवाडी कर्मचारी महिला उपस्थित होत्या.
संघटनेचे निमंत्रक निलेश दातखिळे म्हणाले, केवळ खेड तालुक्यातील अंगणवाडी कर्मचार्यांना जनगणनेसाठी नियुक्त करण्यात आले आहे. हा आदेश तात्काळ मागे घ्यावा. अन्यथा पुणे जिल्ह्यातील आठ हजार अंगणवाडी कर्मचारी एकत्र येऊन तीव्र आंदोलन छेडतील. दरम्यान, भर उन्हात पंचायत समिती कार्यालयापासून तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला.
“अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची नियुक्ती लहान बालकांच्या विकासासाठी करण्यात आली आहे. त्यांना जनगणनेसारखी अतिरिक्त कामे देणे चुकीचे आहे. शासनाच्या आदेशानुसार त्यांच्याकडून अशी कामे घेता येत नाहीत. त्यामुळे जनगणनेसाठी प्रगणक म्हणून काढलेले आदेश तात्काळ रद्द करावेत.”
-कॉ. शुभा शमीम
“भारत जनगणना सुरू झाली असून तालुक्यात कर्मचारी संख्या कमी पडत आहे. त्याचबरोबर इतर सर्वेक्षणांची कामेही सुरू आहेत. त्यामुळे प्रगणक म्हणून अंगणवाडी कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उद्या होणार्या प्रशिक्षणानंतर प्रत्यक्ष किती कर्मचारी अपुरे आहेत हे स्पष्ट होईल. कर्मचारी कमी पडल्यासच अंगणवाडी कर्मचार्यांना सहभागी करून घेतले जाईल.”
– राम बीजे, नायब तहसीलदार, खेड






