Anganwadi Accident – मुळशी तालुक्यातील साठेसाई येथील अंगणवाडी इमारतीच्या छताचे प्लास्टर अचानक कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने त्या दिवशी साप्ताहिक सुट्टी असल्यामुळे अंगणवाडी बंद होती, अन्यथा मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती. सुमारे चार वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या इमारतीच्या छताचा काही भाग कोसळला. या घटनेमुळे बांधकामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अंगणवाडी सुरू असताना हा प्रकार घडला असता, लहान मुलांना दुखापत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेनंतर पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अंगणवाडीला सुट्टी असल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला. मात्र, अशा परिस्थितीत मुलांना शाळेत पाठवणे धोकादायक वाटत आहे, अशी प्रतिक्रिया काही पालकांनी दिली.दरम्यान, संबंधित प्रशासन व ग्रामपंचायतीने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन इमारतीची दुरुस्ती करावी, तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची खात्री करावी, अशी मागणी ग्रामस्थ व पालकांकडून होत आहे.