पुणे, दि. 9 -राज्यात अंगणवाड्यांच्या बळकटीकरणासाठी “अंगणवाडी दत्तक’ धोरण राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून अंगणवाडी केंद्रामध्ये भौतिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या माध्यमातून अंगणवाडी केंद्राचा आदर्श व विकासात्मक कायापालट होणार आहे.
राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पात टप्प्याटप्प्याने वाढ झाली आहे. राज्यात 104 नागरी प्रकल्प व 449 ग्रामीण, आदिवासी असे एकुण 553 एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प आहेत. त्याअंतर्गत 97 हजार 475 अंगणवाडी केंद्रे व 13 हजार 11 मिनी अंगणवाडी केंद्रे अशी एकूण 1 लाख 10 हजार 486 अंगणवाडी केंद्रे मंजूर आहेत. अंगणवाडीतील लाभार्थ्यांना पोषण आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी, संदर्भसेवा, अनौपचारिक पूर्व शालेय शिक्षण, आरोग्य व आहार शिक्षण या सहा सेवा पुरविल्या जात होत्या. यासाठी यंत्रणाही कार्यरत होती. कालांतराने यात आता बदल करावे लागत आहेत.
किरकोळ दुरुस्ती व अन्य ऐच्छिक कामांसाठी 50 हजार रुपयांच्या मर्यादेत सुविधा देता येणार आहेत. अंगणवाडी केंद्रांना सहाय्य करण्यासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागाचे संबंधित जिल्ह्याचे कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद व नागरी प्रकल्पांचे बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा लागणार आहे. विभागाच्या संकेतस्थळावर स्वतंत्र टॅब, लिंकही उपलब्ध आहे.
अंगणवाडी दत्तक धोरणात सहभाग घेणाऱ्यांना विविध सुविधांसाठी सहाय्य करता येणार आहे. अंगणवाडी केंद्रांना भौतिक सुविधेअंतर्गत इमारत दुरुस्ती, रंगरंगोटी, शौचालय बांधकाम व दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याची सुविधा, सौर ऊर्जा संच, अन्न शिजविण्यासाठी साहित्य, पोषण वाटीका उपलब्ध करुन देता येणार आहेत.
यांना योजनेत सहभागी होता येणार
कॉर्पोरेट कंपन्या, अशासकीय सामाजिक स्वयंसेवी संस्था, विविध ट्रस्ट, संघटना, रोटरी क्लब, लायन्स क्लब, व्यक्ती, कुटुंब, समूह आदींना अंगणवाडी दत्तक धोरणात सहभागी होऊन योगदान देता येणार आहे. सीएसआर कार्यक्रमांचाही मोठा फायदा होणार आहे. आदर्श अंगणवाडी योजनेत दीड लाखांच्या मर्यादेत अंगणवाडी केंद्रांना सुविधा उपलब्ध करुन देता येणार आहेत.