Ane Murder Case: जुन्नर तालुका हादरला! आणे गावात तरुण शेतकऱ्याचा सपासपा वार करून खून
Ane Murder Case: आणे (ता. जुन्नर) येथे बुधवारी पहाटे ६ वाजता काळजाचा थरकाप उडवणारी घटना; गाईंना चारा टाकत असताना तरुण शेतकऱ्यावर हल्ला.

Ane Murder Case – आणे (ता.जुन्नर) येथे बुधवारी (दि.८) पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. पूर्वी पोलिसात गुन्हा दाखल केल्याचा राग मनात धरून तरुणाचा भारदार शस्त्राने खून केल्याची थरारक घटना उघडकीस आली आहे. याबाबत आळेफाटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार रामदास दाते (वय ३८) हे तरुण शेतकरी नेहमीप्रमाणे पहाटे घराशेजारील गोठ्याजवळ गाईंना चारा आणण्यासाठी गेले होते.
ते कामात व्यस्त असताना, आधीपासूनच दबा धरून बसलेल्या आरोपी मनोज महादेव हांडे (रा. चैतन्यपूर, ता. अकोले, जि. अहिल्यानगर) याने त्यांच्यावर धारदार शस्त्राने पाठीवर, पोटावर व इतर ठिकाणी सपासपा वार केले. या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले तुषार दाते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. पतीचा ओरडण्याचा आवाज ऐकून पत्नी तातडीने धावली.
समोरचा भयानक प्रसंग पाहून तिने आरडाओरडा केला. आवाज ऐकून वृद्ध आई-वडील व शेजारी धावून येत असल्याचे पाहून मारेकऱ्याने रक्ताळलेला सुरा फेकला आणि पाठीमागच्या टोमॅटोच्या बागेतून पळ काढला. सदर दाते कुटुंबाने या व्यक्तीसोबत वाद असल्याने याआधी २०२५ मध्ये आरोपी मनोज हांडे याच्यावर गुन्हा दाखल केला होता.
या दाखल गुन्ह्याचा मनात राग धरून खून केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी आरोपीस अटक करण्यासाठी पथक तैनात केले आहे. याप्रकरणी आळेफाटा पोलिसांत सविता तुषार दाते (वय ३७, रा.आणे, ता. जुन्नर) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी मनोज महादेव हांडेवर गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळशीराम घंटे करत आहेत.





