Junnar Ghodegaon Highway: ३५८ कोटींची सर्वात कमी बोली! ‘या’ कंपनीला मिळणार जुन्नर-घोडेगाव राष्ट्रीय महामार्गाचे कंत्राट
Junnar Ghodegaon Highway: नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि श्रीक्षेत्र भीमाशंकर जोडणारा रस्ता हायटेक होणार; प्रशासकीय मंजुरीनंतर लवकरच मिळणार कार्यादेश.

Junnar Ghodegaon Highway – श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे जाण्यासाठी भाविकांना उपयुक्त ठरणारा जुन्नर–घोडेगाव–तळेघर (राष्ट्रीय महामार्ग-६१ जोडमार्ग) या बहुप्रतीक्षित रस्ते प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेला अखेर वेग आला असून, शुक्रवार, दि.३ रोजी आर्थिक निविदा उघडण्यात आली. सुमारे ५५.९४ किलोमीटर लांबीच्या या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी ३५८.२२ कोटी रुपयांची सर्वात कमी बोली प्राप्त झाली आहे. त्यामुळे प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला लवकरच प्रारंभ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या प्रकल्पासाठी ऑक्टोबर २०२४ मध्ये ५७४.९८ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. निविदा प्रक्रियेत १८ कंपन्यांनी सहभाग घेतला. त्यापैकी सहा कंपन्या अपात्र ठरल्या, तर १२ कंपन्यांच्या आर्थिक निविदा उघडण्यात आल्या. त्यामध्ये शेळके कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने सर्वात कमी बोली सादर केली. आता संबंधित विभागाकडून सर्वात कमी बोली सादर करणाऱ्या कंपनीची पडताळणी, तांत्रिक मंजुरी आणि अन्य प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून कार्यादेश देण्यात येणार आहे.
त्यानंतर रस्त्याच्या रुंदीकरण व उन्नतीकरणाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल.नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.या रस्त्यामुळे नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि श्री क्षेत्र भीमाशंकर या धार्मिक स्थळांदरम्यानची वाहतूक अधिक सुरक्षित व सुलभ होणार आहे.त्यामुळे कामाला विलंब न लावता युद्धपातळीवर अंमलबजावणी करण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
“निविदा प्रक्रियेला गती मिळणे हा महत्त्वाचा टप्पा आहे. आता प्रशासकीय मंजुरी तातडीने पूर्ण करून काम त्वरित सुरू करणे आवश्यक आहे. कुंभमेळ्यापूर्वी हा मार्ग पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून लवकरात लवकर रस्ता भाविकांसाठी पूर्ण करण्यात यावा.”
– दिलीप मेदगे,समन्वयक पुणे-नाशिक महामार्ग.





