Beef Seized – जुन्नर शहरातील माई मोहल्ला परिसरात पोलिसांनी सोमवारी (दि. ६) पहाटे घातलेल्या धाडीत एका पत्राशेडमध्ये अवैधपणे गोवंशाची कत्तल करून ठेवलेले सुमारे ८०० किलो गोमांस जप्त केले आहे. याप्रकरणी पत्राशेडचा मालक चांद अमीनसाब बेपारी याच्या विरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतानाही शहरात अशा प्रकारे छुप्या पद्धतीने कत्तली होत असल्याचे या कारवाईमुळे पुन्हा एकदा उघड झाले आहे. माई मोहल्ला येथे बेकायदा गोवंश कत्तल सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ शिंदे, अंमलदार सागर हिले, विलास लेंभे, अजित गेंगजे, गणेश शिंदे, प्रशांत दातीर, कांचन गीते यांच्यासह आरसीपी पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी बेपारी याच्या मालकीच्या पत्राशेडमध्ये ८०० किलो गोमांस, लोखंडी सत्तूर आणि चाकू असे साहित्य मिळून आले. पोलीस अंमलदार अजित गेंगजे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून, पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप मोरे व विजय जंगम पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, जुन्नर परिसरात गोवंश हत्याबंदी कायद्याची पायमल्ली होण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी यापूर्वी अनेक गुन्हे दाखल करून काही आरोपींवर तडीपारीची कारवाई केली आहे, तरीही हे अवैध प्रकार थांबताना दिसत नाहीत. अशा वारंवार होणाऱ्या गैरप्रकारांमुळे शहराच्या सामाजिक शांततेला बाधा निर्माण होत असून, पोलिसांनी या मुळापर्यंत जाऊन कठोर पावले उचलावीत, अशी मागणी आता जोर धरत आहे.