Nikita Porwal: मिस वर्ल्ड 2026 मध्ये भारताची शान वाढवणार निकिता पोरवाल; प्रियंका-ऐश्वर्याकडून घेतली प्रेरणा
Nikita Porwal फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2024 विजेती निकिता पोरवाल सध्या मिस वर्ल्ड 2026 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी जोरदार तयारी करत आहे.

Nikita Porwal: मिस वर्ल्डसारख्या आंतरराष्ट्रीय सौंदर्यस्पर्धेचे व्यासपीठ जितके आकर्षक दिसते, तितकीच त्यामागची तयारी कठीण असते. फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2024 विजेती निकिता पोरवाल सध्या मिस वर्ल्ड 2026 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी जोरदार तयारी करत आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने आपल्या तयारीपासून आईच्या पाठिंब्यापर्यंत, कविता लेखन, प्रियंका चोप्रा आणि ऐश्वर्या राय बच्चनकडून मिळालेली प्रेरणा तसेच अभिनयाच्या स्वप्नाबद्दल मनमोकळेपणाने सांगितले.
मुकुटापेक्षा देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा आनंद मोठा
फेमिना मिस इंडियाचा मुकुट मिळाल्यानंतर निकिताला सर्वात जास्त आनंद भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार असल्याचा झाला. तिच्यासाठी हा मुकुट केवळ वैयक्तिक यश नसून देशाचे नाव जगाच्या मंचावर नेण्याची जबाबदारी आहे. मिस वर्ल्डच्या तयारीला सुरुवात केल्यानंतर तिच्या दैनंदिन जीवनातही मोठे बदल झाले आहेत.
रोजची शिस्त आणि सातत्य महत्त्वाचे
निकिताच्या मते, मिस वर्ल्डच्या तयारीसाठी कोणताही जादूचा फॉर्म्युला नाही. दररोज सातत्याने मेहनत करणे आणि शिस्त पाळणे हेच या प्रवासाचे महत्त्वाचे भाग आहेत. रॅम्प वॉक, कम्युनिकेशन ट्रेनिंग, हेअर आणि मेकअप प्रॅक्टिससोबतच वेगवेगळ्या विषयांवर वाचन, कार्यक्रमांना उपस्थित राहणे आणि विविध संस्कृती समजून घेणे यावरही ती भर देते.
या तयारीमुळे तिच्या दिनचर्येत मोठा बदल झाला आहे. पूर्वी सकाळी लवकर उठणे आवडत नसलेली निकिता आता देशाचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी असल्यामुळे वेळेची तमा न बाळगता काम करते. कधी रात्री उशिरा मेकअप सुरू करून पहाटेपर्यंत तयार राहावे लागते.

Nikita Porwal
कविता लेखनातून मिळतो निवांतपणा
ग्लॅमरच्या जगापासून दूर असताना निकिताला कुटुंबासोबत वेळ घालवायला आणि लिहायला आवडते. विशेषतः कविता लिहिणे तिच्या आवडीचे आहे. लेखन तिच्यासाठी स्वतःसोबत वेळ घालवण्याचा आणि मन शांत करण्याचा मार्ग आहे. त्यामुळे व्यस्त वेळापत्रकातून वेळ मिळाला की ती कविता लिहिणे पसंत करते.
आईचा विश्वास ठरला मोठा आधार
निकिताच्या यशामागे तिच्या आईचा मोठा वाटा आहे. अनेकदा स्वतःवर शंका निर्माण झाल्या असतानाही तिच्या आईने तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवला. मध्य प्रदेशातून याआधी राष्ट्रीय पातळीवर मिस इंडिया विजेती होण्याची परंपरा नसल्याने निकिताच्या मनात काही वेळा प्रश्न निर्माण झाले होते. मात्र, आईने तिला कधीही हार मानू दिली नाही. त्यामुळे आपल्या यशाचे मोठे श्रेय ती आईला देते.
प्रियंका आणि ऐश्वर्या प्रेरणास्थान
निकिता प्रियंका चोप्राला आपली प्रेरणा मानते. मॉडेलिंगपासून बॉलिवूड आणि त्यानंतर हॉलिवूडपर्यंतचा प्रियंकाचा प्रवास तिला प्रेरणादायी वाटतो. सतत पुढे जाण्याची तिची वृत्ती निकिताला विशेष आवडते.
तर ऐश्वर्या राय बच्चनच्या भारताचे प्रतिनिधित्व करण्याच्या पद्धतीनेही निकिता प्रभावित आहे. आधुनिक विचारांसोबत भारतीय संस्कृती आणि आपल्या मुळांशी जोडलेले राहण्याची प्रेरणा तिला ऐश्वर्याकडून मिळते.

Nikita Porwal
मिस वर्ल्डनंतर अभिनयाचे स्वप्न
निकितासाठी मिस वर्ल्ड हा अंतिम टप्पा नाही. अभिनय करणे हे तिचे जुने स्वप्न आहे. तिने थिएटरचे शिक्षण घेतले असून अभिनयाची आवड आधीपासूनच आहे. भविष्यात चांगली संधी मिळाल्यास चित्रपटांमध्ये काम करण्याची तिची इच्छा आहे. दक्षिणेतील अभिनेता किच्चा सुदीपसोबत स्क्रीन शेअर करण्याचेही तिचे स्वप्न आहे.
‘माटी’मधून समाजासाठी काम करण्याचा प्रयत्न
मिस वर्ल्ड 2026 मध्ये निकिता ‘ब्युटी विथ अ पर्पज’ अंतर्गत ‘माटी’ हा प्रकल्प घेऊन सहभागी होणार आहे. आदिवासी भागांना भेट दिल्यानंतर तिला तेथील महिला आणि मुलांकडे कौशल्य व स्वप्ने असूनही पुरेशा संधी उपलब्ध नसल्याचे जाणवले. त्यामुळे शिक्षण, आरोग्य आणि सन्मानासोबत त्यांची संस्कृती व ओळख जपण्यासाठी काम करण्याचा तिचा प्रयत्न आहे.
निकिताच्या मते, मिस वर्ल्डचा मंच केवळ मुकुट जिंकण्यासाठी नसून एखाद्याच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी वापरता आला, तर तेच तिच्यासाठी खरे यश असेल.

