Anant Nag : ज्येष्ठ कन्नड अभिनेते अनंत नाग यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग (Anant Nag) यांना त्यांच्या दीर्घ आणि उल्लेखनीय चित्रपट कारकिर्दीतील योगदानासाठी प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 जाहीर करण्यात आला आहे.

Anant Nag : भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग (Anant Nag) यांना त्यांच्या दीर्घ आणि उल्लेखनीय चित्रपट कारकिर्दीतील योगदानासाठी प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 जाहीर करण्यात आला आहे.
केंद्र सरकारने या सर्वोच्च चित्रपट पुरस्काराची बुधवारी घोषणा केली. त्यांच्या भारतीय सिनेमातील योगदानाची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
अनंत नाग (Anant Nag) यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार २२ सप्टेंबर २०२६ रोजी प्रदान केला जाणार आहे. गुजरातमधील एकता नगर, केवडिया येथे 72 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात राष्ट्रपतींच्या हस्ते विविध राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
अनंत नाग हे कन्नड चित्रपटसृष्टीतील अत्यंत ज्येष्ठ आणि परिचित अभिनेते म्हणून ओळखले जातात. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. कन्नड चित्रपटांसोबतच त्यांनी हिंदी आणि इतर भाषांमधील चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्यांच्या अभिनय कारकिर्दीला वेगळे वळण देणाऱ्या चित्रपटांमध्ये अंकुर चा विशेष उल्लेख केला जातो.
प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या या चित्रपटातून अनंत नाग (Anant Nag) यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत महत्त्वाची ओळख निर्माण केली. मिंचिना ओटा, हंसगीते, अंकुर आणि मंथन यांसारख्या हिंदी आणि कन्नड चित्रपटांमधील प्रभावी अभिनयाने त्यांनी चाहत्यांची मने जिंकली आहेत. पाच दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी २५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
दरम्यान, दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान मानला जातो. 1969 मध्ये हा पुरस्कार सुरू करण्यात आला. भारतीय सिनेमाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा सन्मान दिला जातो. पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार अभिनेत्री देविका राणी यांना प्रदान करण्यात आला होता.






