Analog Paneer Ban : तुकाराम मुंढेंचं कौतुक अन् भेसळीवर संताप.! अॅनालॉग पनीरवर कायमस्वरूपी बंदीची मागणी; दुग्ध क्षेत्राची मोठी प्रतिक्रिया
पनीर बनविण्यासाठी दूध खरेदीस स्पर्धा निर्माण होईल. त्यातून शेतक-यांनाही वाजवी दर मिळणे अपेक्षित असून, अॅनालॉग पनीरवर कायमस्वरूपी बंदी घालण्याचीही मागणी होत आहे.

Analog Paneer Ban – राज्याच्या अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अॅनालॉग किंवा दुग्धविरहित पनीरचे उत्पादन, प्रक्रिया, तयारी, पॅकिंग, साठवण, वितरणावर एक वर्षासाठी बंदी घालण्याच्या आदेशाचे दुग्ध वर्तुळातून स्वागत करण्यात येत आहे.
यामुळे दुधापासूनच्या शुद्ध पनीरला चांगले दिवस येण्याची आशा निर्माण झाली असून, पनीर बनविण्यासाठी दूध खरेदीस स्पर्धा निर्माण होईल. त्यातून शेतक-यांनाही वाजवी दर मिळणे अपेक्षित असून, अॅनालॉग पनीरवर कायमस्वरूपी बंदी घालण्याचीही मागणी होत आहे.
राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या शिष्टमंडळाने सर्वप्रथम मुंढे यांची मुंबई येथे भेट घेऊन अॅनालॉग पनीरवर बंदी घालण्याची मागणी केली होती. याची दखल घेतल्याने या कल्याणकारी संघाकडून निर्णयाचे स्वागत असल्याची प्रतिक्रिया अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांनी दिली.
ते म्हणाले, २०० रुपये किलोने स्वस्त मिळणा-या अॅनालॉग पनीरच्या उपलब्धतेमुळे त्याचा खप राहत असे. यापूर्वी सुट्या स्वरूपात होणाऱ्या पनीरच्या विक्रीत जवळपास ५० टक्क्यांनी घट झाली असून, ग्राहकांचा कल आता ब्रँडेड व पॅकबंद पनीरकडे वळला आहे. परिणामी, पनीरच्या विक्रीत सुमारे ४० टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती दुग्ध व्यवसायातील सूत्रांनी दिली.
साहजिकच डेअ-यांकडील दुधापासूनच्या शुद्ध पनीरला तुलनेने मागणी कमी राहत असे. या पनीरचा भाव सरासरी ४०० रुपये किलो आहे. आताअॅनालॉगवर बंदी घातल्यामुळे शुद्ध पनीरला मागणी वाढेल आणि शेतक-यांनाही चार पैसे जादा दर शक्य होईल.
आगामी श्रावण महिना तसेच गौरी-गणपती सणांच्या पार्श्वभूमीवर दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीत आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे. डेअरी उद्योगासाठी फायदेशीर निर्णय घेतल्याबद्दल मुंढे यांचे आम्ही अभिनंदनही करीत आहोत.






