Aaditya Thackeray : देशात अघोषित आणीबाणी सुरू.! आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे, आमचे नेते संजय राऊत सध्या दिल्लीत उपस्थित आहेत, असे सांगत त्यांनी गद्दार ज्ञानेश कुमार गेलेच पाहिजेत, अशी आक्रमक भूमिका मांडली.

Aaditya Thackeray – देशभरात सध्या आंदोलनांचे वातावरण तापले असून, महाराष्ट्रातील पुणे शहरात एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे वातावरण पेटले आहे. यादरम्यान, राजधानी दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत काँग्रेससह विविध पक्ष आक्रमक झाले आहेत.
कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या नावाखाली दिल्ली सरकारने घेतलेले कठोर निर्णय, मेट्रो-रेल्वे वाहतूक बंद करणे आणि पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी केंद्र व राज्य सरकारवर गंभीर शब्दांत हल्लाबोल केला आहे.
देशात सध्या अप्रत्यक्ष आणीबाणी चालू असून भाजप यावर मूग गिळून बसली आहे. मुंबई आणि महाराष्ट्राची यांना भीती वाटत आहे, त्यामुळेच लोकांना विनाकारण ताब्यात घेतले जात आहे आणि नोटिसा पाठवल्या जात आहेत. पण यावर बोलण्याची कोणाचीही हिंमत नाही, असा घणाघात आदित्य ठाकरेंनी केला.
दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे, आमचे नेते संजय राऊत सध्या दिल्लीत उपस्थित आहेत, असे सांगत त्यांनी गद्दार ज्ञानेश कुमार गेलेच पाहिजेत, अशी आक्रमक भूमिका मांडली.
पुण्यात हजारो आंदोलक रस्त्यावर बसले आहेत, त्यांच्या घरी दुष्काळाची तीव्र झळ पोहोचत आहे. मात्र, प्रश्न सोडवण्याऐवजी हे सरकार पेपर फोडणाऱ्यांना पाठीशी घालत आहे. मुख्यमंत्री आपल्या मित्राला का वाचवत आहेत, असा थेट सवाल करत आदित्य ठाकरेंनी विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्यावरून राज्य सरकारला धारेवर धरले.
शिवसेना पक्ष आणि चिन्हाची कायदेशीर लढाई मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. मात्र, आता कुठेतरी असा विश्वास वाटू लागला आहे की, न्याय मिळायला थोडा उशीर होईल पण अखेर न्याय नक्की मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.






