ESIC New Rules 2026: आजारपण आणि मातृत्व लाभासाठी क्लेमची गरज नाही; जाणून घ्या नवे नियम
ESIC New Rules 2026: ESIC चे २०२६ चे नवे नियम जाहीर. पात्र कर्मचाऱ्यांना आजारपण आणि मातृत्व लाभासाठी स्वतंत्र क्लेम करण्याची गरज नाही. अटी आणि अपघातातील लाभांची माहिती जाणून घ्या.

ESIC New Rules 2026: कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ESIC) कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे नियम बदलले आहेत. तब्बल ७६ वर्षांपासून लागू असलेल्या १९५० च्या नियमांची जागा आता कर्मचारी राज्य विमा (सामान्य) विनियम, २०२६ ने घेतली आहे.
२१ नोव्हेंबर २०२६ रोजी हे नवे नियम राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आले. यानुसार पात्र कर्मचाऱ्यांना आजारपण आणि मातृत्व लाभासाठी स्वतंत्र अर्ज किंवा क्लेम करण्याची गरज राहणार नाही. ESIC कडून ही रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाणार आहे. मात्र, यासाठी काही अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.
कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतील?
नव्या नियमानुसार आजारपण आणि मातृत्व लाभाची रक्कम थेट बँक खात्यात (DBT) जमा होण्यासाठी तीन अटी आहेत.
1. कर्मचाऱ्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र ESIC च्या माहिती प्रणालीतून तयार झालेले असावे.
2. संबंधित कंपनी किंवा मालकाने आवश्यक मासिक विवरणपत्र (फॉर्म 8B) ESIC च्या पोर्टलवर जमा केलेले असावे.
3. कर्मचाऱ्याचे आधारशी जोडलेले बँक खाते असावे. तसेच ESIC विमा क्रमांक आधारशी जोडलेला असावा.
या अटी पूर्ण झाल्यास स्वतंत्र क्लेम न करता लाभाची रक्कम मिळू शकते. त्यामुळे कर्मचाऱ्यांची कागदपत्रांची धावपळ कमी होणार आहे.
कामाच्या ठिकाणी दुखापत झाल्यास काय होणार?
काम करताना अपघात होऊन कर्मचारी जखमी झाल्यास किंवा त्याला कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास लाभ मिळवण्याची प्रक्रियाही सोपी करण्यात आली आहे. अशा घटनेला कामाशी संबंधित अपघात म्हणून मान्यता मिळाल्यानंतर मालकाने दिलेला अपघाताचा अहवाल हाच क्लेम मानला जाईल. त्यामुळे संबंधित लाभांसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची गरज राहणार नाही.
कर्मचाऱ्याला तात्पुरते किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास नियमानुसार लाभ दिला जाईल. कर्मचाऱ्याचा कामाच्या ठिकाणी झालेल्या अपघातामुळे मृत्यू झाल्यास पात्र आश्रितांनाही आर्थिक मदत मिळू शकते. मात्र, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि पात्रतेच्या अटी पूर्ण कराव्या लागतील.
महत्त्वाची बाब; अंमलबजावणी कधीपासून?
नव्या नियमांमध्ये कर्मचारी आणि मालकांच्या योगदानाचे प्रमाण बदलल्याची तरतूद नाही. मात्र, एक महत्त्वाची बाब म्हणजे क्लेमशिवाय लाभ देण्याच्या नव्या व्यवस्थेची प्रत्यक्ष अंमलबजावणी ESIC चे महासंचालक स्वतंत्र आदेशाद्वारे निश्चित करणार आहेत. त्यामुळे २१ नोव्हेंबरला नियम प्रसिद्ध झाले असले, तरी ही सुविधा त्याच दिवसापासून प्रत्यक्ष सुरू झाली आहे, असे समजणे योग्य ठरणार नाही.
तसेच, नव्या व्यवस्थेच्या अटी पूर्ण न झाल्यास कर्मचारी नेहमीच्या पद्धतीने क्लेम दाखल करू शकतो. मालकाने विवरणपत्र वेळेत जमा केले नाही, एवढ्याच कारणामुळे कर्मचाऱ्याचा लाभ रोखला जाणार नाही.





