Team India Head Coach : मोठी बातमी..! BCCIनं निश्चित केला राहुल द्रविडचा उत्तराधिकारी, कोणत्याही क्षणी होऊ शकते नावाची घोषणा…

Team India Head Coach : माजी अनुभवी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरची भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती जवळपास निश्चित झाली आहे. बीसीसीआय त्याच्या नावाची औपचारिक घोषणा कधीही करू शकते. टीम इंडियाचा नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून गंभीर हा राहुल द्रविडची जागा घेऊ शकतो.
टीम इंडियासाठी गौतम गंभीरचा रेकॉर्ड मजबूत आहे. तो विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होता. गंभीर एक मार्गदर्शक म्हणूनही यशस्वी ठरला आहे. आयपीएल 2024 मध्ये तो कोलकाता नाइट रायडर्सचा मार्गदर्शक होता आणि संघाने विजेतेपद पटकावले. टीम इंडिया नवीन मुख्य प्रशिक्षकाच्या शोधात आहे. त्यासाठी त्यांनी अर्ज मागवले होते. एका रिपोर्टनुसार बीसीसीआय आणि गौतम गंभीर यांच्यात प्रशिक्षक पदासाठीची चर्चा झाली आहे. अर्थात अद्याप नावाची घोषणा झाली नसली तरी गंभीर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते.
क्रिकबझच्या वृत्तानुसार, आयपीएल फ्रँचायझीच्या मालकाने या मुद्द्या संदर्भात माहिती दिली आहे. (An IPL team owner has confirmed Gautam Gambhir’s appointment as India’s next men’s head coach) बातमीनुसार, त्यांनी सांगितले आहे की, गौतम गंभीर टीम इंडियाचा पुढील मुख्य प्रशिक्षक असेल. याबाबत गंभीरची बीसीसीआयसोबत बैठक झाली आहे. त्याची अधिकृत घोषणा लवकरच होऊ शकते. मात्र, टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. शाहरुख खानलाही माहित आहे की, गंभीरला मुख्य प्रशिक्षकपदासाठी संपर्क साधण्यात आला आहे.
केकेआरपूर्वी गंभीर हा लखनऊ सुपर जायंट्सचा मेंटर होता. त्यांच्या उपस्थितीत संघाने चांगली कामगिरी केली. मात्र तो गेल्याने यंदा संघाची कामगिरी घसरली. लखनौचा संघ आयपीएल 2024 च्या प्ले ऑफमध्येही पोहोचू शकला नाही. दुसरीकडे केकेआरने विजेतेपद पटकावले. तसेच आयपीएल 2024 च्या हंगामात प्लेऑफमध्ये पोहोचणारा केकेआर हा पहिला संघ होता.
गंभीरची आंतरराष्ट्रीय कारकीर्द…
गौतम गंभीरची आंतरराष्ट्रीय कारकीर्द चमकदार आहे. त्याने टीम इंडियासाठी 147 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या कालावधीत 5 हजार 238 धावा केल्या आहेत. गंभीरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 11 शतके आणि 34 अर्धशतके केली आहेत. त्याने 58 कसोटी सामन्यांमध्ये 4 हजार 154 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 9 शतके आणि 22 अर्धशतके केली आहेत. त्याने द्विशतकही झळकावले आहे. गंभीरने भारतासाठी 37 टी-20 सामनेही खेळले आहेत. यामध्ये 932 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 7 अर्धशतके केली आहेत.





