Harbhajan Supports Gambhir : “गंभीरचं रोखठोक बोलणं पचवणं प्रत्येकाला जमत नाही!”; कोचवर टीका करणाऱ्यांना भज्जीचं चोख प्रत्युत्तर
Harbhajan Supports Gambhir : भारताचा माजी दिग्गज गोलंदाज हरभजन सिंगने गंभीरच्या स्वभावाबाबत मोठा खुलासा करत त्याचे जोरदार समर्थन केले आहे.

Harbhajan Singh Supports Gautam Gambhir Indian Team Head Coach Criticism : भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) हे आपल्या आक्रमक आणि रोखठोक स्वभावामुळे सातत्याने टीकाकारांच्या निशाण्यावर असतात. खराब कामगिरीनंतरही बचावात्मक होण्याऐवजी उघडपणे सडेतोड उत्तरे देण्याच्या त्यांच्या पद्धतीवर नेहमीच प्रश्न उपस्थित केले जातात. या पार्श्वभूमीवर भारताचा माजी दिग्गज गोलंदाज हरभजन सिंगने (Harbhajan Singh) गंभीरच्या स्वभावाबाबत मोठा खुलासा करत त्याचे जोरदार समर्थन केले आहे. “गौतम जे बोलतो ते कटू सत्य असते आणि ते पचवणे प्रत्येकाला जमत नाही,” असे भज्जीने स्पष्टपणे म्हटले आहे.
“संघाच्या पराभवासाठी नेहमी कोचलाच का दोष द्यायचा?”
जुलै २०२४ मध्ये भारतीय संघाच्या हेड कोचपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर गंभीरचा कार्यकाळ नेहमीच चर्चेत राहिला आहे. ‘पीटीआय’ (PTI) या वृत्तसंस्थेशी बोलताना हरभजन सिंगने गंभीरवर होणाऱ्या सततच्या टीकेबद्दल आश्चर्य व्यक्त केले. भज्जी म्हणाला, “गौतमवर एवढी टीका का होते, हे मला कधीच समजले नाही. जेव्हा संघ चांगली कामगिरी करत नाही, तेव्हा लोक नेहमी प्रशिक्षकालाच का दोष देतात? मी ज्या गंभीरला ओळखतो, तो खेळताना प्रचंड महत्त्वाकांक्षी आणि संघाला नेहमी पुढे ठेवणारा खेळाडू होता.”
VIDEO | PTI Exclusive: Former India cricketer and Rajya Sabha MP Harbhajan Singh (@harbhajan_singh) says, “When someone becomes a coach, naturally, if the team does not perform well, the coach also comes under pressure. Gautam Gambhir has always been a very passionate player. He… pic.twitter.com/0BV7AfYshd
— Press Trust of India (@PTI_News) August 13, 2026
टी-२० विश्वचषक अन् चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, पण कसोटीत अपयश –
गंभीरच्या कार्यकाळात भारतीय संघाने टी-२० विश्वचषक २०२६ आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी हे दोन मोठे जागतिक किताब जिंकले आहेत. वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये भारताने घवघवीत यश मिळवले असले तरी कसोटी क्रिकेटमध्ये मात्र संघाला मोठा धक्का बसला आहे. मायदेशात न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेकडून झालेला व्हाईटवॉश तसेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पराभवामुळे गंभीरच्या कोचिंगवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गंभीरच्या स्वभावातील गुपिते भज्जीने उलगडली –
गंभीरच्या वैयक्तिक स्वभावाबद्दल सांगताना हरभजन म्हणाला की, सुरुवातीला संघात आल्यावर गंभीर अंतर्मुख (Introvert) होता आणि खूप कमी लोकांशी बोलायचा. संघात स्थान पक्के झाल्यानंतरही वीरेंद्र सेहवाग, अमित मिश्रा आणि मुनाफ पटेल यांसारख्या मोजक्याच खेळाडूंसोबत त्याची घट्ट मैत्री होती. “तो खूप चांगला माणूस आहे. तो थेट आणि स्पष्ट बोलतो. त्याच्या बोलण्याच्या पद्धतीमुळे लोकांना तो वेगळा वाटू शकतो, पण तो जे बोलतो ते कटू सत्य असते आणि ते पचवणे अनेकांना कठीण जाते,” असे हरभजनने शेवटी सांगितले.





