गजा मारणेच्या टोळीचा धुमाकूळ; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांच्या कर्मचाऱ्यास बेदम मारहाण

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध गुन्हेगार गजानन ऊर्फ गजा मारणे टोळीतील गुडांनी खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कर्मचाऱ्यास बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. मारणेसह त्याची टोळी सध्या जामिनावर बाहेर आहे. तरीही पुण्याचे मालक अशा आशयाचे रील समाजमाध्यमात प्रसारित करून ते दहशत माजवत आहेत. या रीलप्रकरणी गुन्हे शाखेने मारणेची दोन वेळा झाडाझडती घेतली आहे.
देवेंद्र पुरुषोत्तम जोग (३३, रा. कोथरूड) असे मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी अमोल तापकीर (३०), ओम धर्मजिज्ञासू (२९) आणि किरण पडवळ (३०, सर्व रा. कोथरूड ) यांना अटक केली आहे. हे तिघेही सराईत गुन्हेगार आहेत. जोगला भररस्त्यात लाथा- बुक्क्यांनी आणि पट्ट्याने बेदम मारहाण करण्यात आली आहे. त्यामध्ये त्याचे नाक आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेचार ते पावणेपाचच्या सुमारास कोथरूडमधील भेलकेनगर चौक येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण कोथरूडमधील मयूर कॉलनी येथे राहण्यास आहे. तो एका आयटी कंपनीत नोकरी करतो, तसेच मोहोळ यांच्या सोशल मीडिया सेलचे कामही पहातो. शिवजयंतीनिमित्त बुधवारी कंपनीला सुटी होती. त्यामुळे तक्रारदार घरीच होता. दुपारी चारच्या सुमारास तक्रारदार वैयक्तिक कामानिमित्त दुचाकीवरून भेलकेनगर येथील काम करून पुन्हा घराकडे निघाला होता.
त्या वेळी भेलकेनगर चौकातून मारणे टोळीतील आरोपी दुचाकीवरून चालले होते. तक्रारदार त्यांच्या समोरून दुचाकी घेऊन पुढे गेला. त्याचा राग आल्याने आरोपींनी पळत जाऊन तक्रारदाराला थांबवत शिवीगाळ केली. गाडी हळू चालवता येत नाही का, धक्का का दिला, असे म्हणत मारहाण केली. एकाने नाकावर जोराने ठोसा मारला. त्यानंतर त्याला रस्त्यावर पाडून लाथा- बुक्क्यांनी आणि कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली.
राजकीय वरदहस्त?
मध्यंतरी गजानन मारणेचे रील्स समाजमाध्यमावर ठेवणाऱ्या तीन तरुणांना गुन्हे शाखेने अटक केली होती. तेव्हा गजानन मारणेचा सहभाग आढळल्यास त्याच्यावरही कारवाई होईल असे सांगितले होते. मात्र, यासंदर्भात पुढे काहीच झाले नाही. गजानन मारणेला गुन्हे शाखेत चौकशीला बोलावल्यावर इतर गुन्हेगारांसारखी वागणूक न देता त्याला विशेष वागणूक दिली जाते. गजानन मारणेला असलेल्या राजकीय वरदहस्त असल्याच्या चर्चेमुळे पोलिसांचेही हात बांधले गेले आहेत.





