Census of India : लोकसंख्येचं अचूक चित्र मिळणार.! 1 एप्रिल 2026 पासून जनगणनेचा पहिला टप्पा सुरू

Census of India : केंद्र सरकारने आगामी 2026 च्या जनगणनेच्या पहिल्या टप्प्याची तारीख निश्चित केली आहे. रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार नारायण यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून कळवले आहे की, गृह सूचीकरण मोहीम आणि गृह जनगणना 1 एप्रिल 2026 पासून सुरू होणार आहे.
ही जनगणना दोन टप्प्यात केली जाणार आहे. यातील पहिला टप्यात घरांची यादी करण्याचे काम करण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक घराची स्थिती, सुविधा आणि संसाधनांची माहिती घेतली जाते.
दुसरा टप्पा लोकसंख्या जनगणनेचा आहे. हा टप्पा 1 फेब्रुवारी 2027 पासून सुरू होईल. यामध्ये प्रत्येक व्यक्तीची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक माहिती घेतली जाईल.
यावेळची जनगणना विशेष असेल. कारण ती पूर्णपणे डिजिटल माध्यमातून केली जाईल. यासाठी मोबाईल अॅपचा वापर केला जाईल. याव्यतिरिक्त, लोकांना स्वतः माहिती देण्याची सुविधादेखील दिली जाईल.
या जनगणनेच्या कामासाठी 34 लाखांहून अधिक गणनाकार आणि पर्यवेक्षक तसेच सुमारे 1.3 लाख जनगणना कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. ही आतापर्यंतची सोळावी आणि स्वातंत्र्यानंतरची आठवी जनगणना असेल.





