अमृतकण : संधी सोडू नका

“”मुलांनो, जीवनामध्ये आपल्याला संधी ही वारंवार मिळत नसते. तेव्हा मिळालेल्या संधीचं सोनं करून घेण्यातच खरं शहाणपण असतं. पण हे माणसाला कळायला हवे ना! नाहीतर संधी येत असते, दार वाजवून जात असते आणि आपण मात्र ती चुकवत असतो. त्या दुर्दैवी माणसासारखी…”
“”आजोबा! कोण तो दुर्दैवी माणूस, काय झालं त्याचं? आम्हाला सांगा ना त्याची गोष्ट.” मुलांनी आजोबांना आग्रह केला. “”थांबा सांगतो. नीट लक्ष देऊन ऐका”, असं म्हणून आजोबांनी गोष्ट सांगायला सुरुवात केली. एक होतं गाव, त्या गावात होतं एक देऊळ. त्या मंदिराचा एक पुजारी होता त्याचं नाव इच्छाराम. इच्छाराम देवळातल्या देवाची पूजाअर्चा करायचा. गावात चार घरी पंचांग सांगायचा. लोक देतील ते खायचा आणि आनंदाने मंदिरातच राहायचा. त्याचा त्याच्या देवावर फार मोठा विश्वास होता. आपलं भलं बुरं जे काही होणार ते त्या देवामुळेच असं त्यास वाटत असे. तसा त्याचा विश्वासही होता.
एके वर्षी काय झाले. गावात सतत आठ दिवस पाऊस पडला. नदीला पूर आला. लोकांच्या घरादारात पाणी शिरले. संसार बुडाले. जो तो आसरा शोधण्यासाठी दुसऱ्या गावाकडे जाऊ लागला.
लोकांनी इच्छारामालाही गाव सोडून दूर चालण्याबद्दल आग्रह केला. पण छे, इच्छाराम काही गाव सोडून जायला तयार होईना. तो म्हणायचा, “नको, मी नाही येत, तुम्ही जा. माझा देव माझं नक्कीच रक्षण करील.’ लोक निघून गेले. नदीचा पूर हळूहळू वाढूच लागला.
तेव्हा एक पट्टीचा पोहणारा इच्छारामाच्या जवळ आला आणि म्हणाला, “”अहो पुजारीबुवा! नदीला पूर आला आहे. पाणी झपाट्याने वाढते आहे. चला मी तुम्हाला नेतो सुरक्षित जागी, चला माझ्या सोबत.” “”नको, तू नको. तू जा, देव माझी काळजी घेईल’, पुजाऱ्याने असे उत्तर दिले.
पुराचे पाणी वाढूच लागले. तोच एक छोटीशी नाव पुजाऱ्याला पाण्याच्या प्रवाहातून वाहत त्याच्या दिशेने येताना दिसली. पण तरीही तो काही पुढे झाला नाही की, त्याने त्या नावेत बसून स्वत:ला सुरक्षित जागी नेण्याचा साधा प्रयत्नही केला नाही. पुढच्यावेळी मात्र जो काही पाण्याचा प्रचंड मोठा लोंढा आला. तो मात्र आपल्या सोबतच त्या इच्छारामाला घेऊन गेला. पोहता न येणारा बिचारा इच्छारामाच्या अखेर नाकातोंडात पाणी गेले आणि तो मेला.
स्वर्गात गेल्यावर इच्छाराम देवाशी भांडू लागला की, “”देवा! मी तुझी इतकी सेवा केली, पूजा केली, तू माझं रक्षण करशील म्हणून तुझा विश्वास धरला. पण तू मात्र माझा विश्वासघात केलास, तू माझ्या मदतीला धावून आला नाहीस? देवा तू हे असं का केलेस?”
त्यावर देव म्हणाला, “”बाबा रे! मी तुझ्या रक्षणाचा प्रयत्न केला नाही, तुला मदत केली नाही, हे तुझं म्हणणं चुकीचं आहे. मी तुला स्वत:चा जीव वाचविण्याच्या दोन संधी दिल्या. एकदा मी पोहणारा होऊन तुला मदत करायला आलो. तू ती मदत स्वीकारली नाहीस. दुसऱ्यांदा मी तुझ्यासाठी नाव पाठविली तिचाही तू उपयोग करून घेतला नाहीस. मी तुला एक एक संधी देत होतो, पण तूच त्या घेतल्या नाहीस त्याला मी काय करू?”
देवाचं हे बोलणं ऐकलं आणि मग मात्र इच्छारामाला आपली चूक कळली. संधी येते, आपण त्या संधीचा फायदा घ्यायचा असतो. ती संधी हातची उगाच वाया जाऊ द्यायची नसते हे त्याला कळलं. पण कधी, मेल्यावर. त्याचा काय उपयोग? नाही का? म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा. संधी वारंवार मिळत नाही म्हणून त्या हातच्या जाऊ द्यायच्या नसतात. गोष्ट थांबवून आजोबांनी एका प्रश्नार्थक मुद्रेने मुलांकडे पाहिलं. तेव्हा मुलं म्हणाली, “”आजोबा तुमच्या या गोष्टीचं तात्पर्य आलंय आमच्या लक्षात.”





