Teachers News : शिक्षकांच्या उन्हाळी सुट्ट्या रद्द; काय आहे कारण?
Teachers News :

Teachers News : यंदाच्या उन्हाळ्यात सुट्टीचे नियोजन करणाऱ्या शिक्षकांसाठी आनंदाऐवजी कामाचा डोंगर उभा राहिला आहे. अमरावती जिल्ह्यातील शिक्षकांना यंदा डिजिटल जनगणनेच्या कामासाठी जुंपले जाणार असून, शिक्षण अधिकाऱ्यांनी तसे आदेश निर्गमित केले आहेत.
यामुळे शिक्षकांच्या हक्काच्या सुट्ट्यांवर गदा आली आहे.
शिक्षकांना १६ मे ते १५ जून या काळात मुख्यालयात हजर राहणे अनिवार्य आहे. ३० एप्रिलला शैक्षणिक सत्र संपल्यानंतर २ मे पासून शाळांना सुट्ट्या लागणार होत्या. मात्र, राष्ट्रीय कामासाठी शिक्षकांची सुट्टी रद्द करण्यात आली आहे.
यंदाची जनगणना डिजिटल पद्धतीने होणार असून, त्यासाठी शिक्षकांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. जिल्हास्तरीय प्रशिक्षण पूर्ण झाले असून आता तालुकास्तरीय प्रशिक्षण पार पडणार आहे.
गेल्या दोन वर्षांत लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या कामात व्यस्त असलेल्या शिक्षकांना यंदा सुट्टी मिळेल अशी आशा होती. मात्र, पर्यटन, लग्नकार्य आणि देवदर्शनाचे नियोजन फिस्कटल्याने शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
शिक्षक हे दीर्घ सुट्टी उपभोगणारे कर्मचारी या गटात मोडतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत केलेल्या या अतिरिक्त कामाच्या बदल्यात प्रशासनाने ‘बदली रजा’मंजूर करावी, अशी मागणी आता शिक्षक संघटनांकडून जोर धरत आहे.





