Amitesh Kumar: पोलीस आयुक्तांविरूद्ध थेट हायकोर्टात याचिका! ध्वनिप्रदूषण रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप…वाचा सविस्तर
Amitesh Kumar: शहरातील डीजे, बार व पबवरील ध्वनिप्रदूषणास आळा घालण्यास पोलीस प्रशासन अपयशी; ग्राहक पंचायतीसह ६ संघटनांची मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका.

Amitesh Kumar – शहरातील ध्वनिप्रदूषणास आळा घालण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायत, भारतीय मजदूर संघ, पुणे जिल्हा सीएचएस अँड अपार्टमेंट्स फेडरेशन, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ यांच्यासह सहा याचिकाकर्त्यांनी ही याचिका दाखल केली आहे.
२७ ऑगस्ट २०२६ रोजी ही याचिका दाखल झाली आहे. यामध्ये याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. सत्या मुळे काम पाहत आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्रमांक १९१/२०२३ मध्ये २० ऑगस्ट २०२४ रोजी ध्वनिप्रदूषण नियंत्रणाबाबत निर्देश दिले होते. त्याची पुणे पोलिसांनी प्रभावी अंमलबजावणी केली नसल्याचा दावा याचिकेत केला आहे.
ध्वनिप्रदूषण रोखणे तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस आयुक्तांची असल्याने न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात कसूर झाल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. गणेशोत्सव, ईदसह विविध धार्मिक सण, राजकीय सभा, मिरवणुका तसेच अन्य कार्यक्रमांमध्ये मोठ्या आवाजातील डीजे आणि ध्वनिक्षेपकांचा वापर केला जातो. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषणाचा सामना करावा लागत आहे.
विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, आजारी व्यक्ती आणि निवासी भागातील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. ध्वनिप्रदूषणाच्या तक्रारींसाठी नागरिकांकडून पोलीस हेल्पलाइनवर संपर्क साधला जात असतानाही अनेक प्रकरणांमध्ये अपेक्षित कारवाई होत नाही. ढोल, शिंग, संगीत वाद्ये, लाऊड ॲम्प्लिफायर किंवा अन्य ध्वनी निर्माण करणाऱ्या साधनांच्या वापराबाबतही नियमांचे काटेकोर पालन आवश्यक असल्याचे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे.
केवळ सण-उत्सवांमधील डीजेपुरता हा प्रश्न मर्यादित नसून बार, पब, रेस्टॉरंट आणि मनोरंजन केंद्रांमधून होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाचाही याचिकेत उल्लेख करण्यात आला आहे. या याचिकेमुळे आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलीस आता या आरोपांवर काय भूमिका मांडतात आणि न्यायालय या प्रकरणात कोणते निर्देश देते, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.





