Amitesh Kumar : “पुण्याला गुन्हेगारांची राजधानी म्हणणं चुकीचं”; सुप्रिया सुळेंच्या टीकेला पोलीस आयुक्तांचं ९ पानांचं सडेतोड उत्तर
Amitesh Kumar : खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुण्याच्या कायदा-सुव्यवस्थेवरील टीकेला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे ९ पानी पत्राद्वारे सविस्तर प्रत्युत्तर.

Amitesh Kumar – शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नऊ पानी सविस्तर पत्र लिहून गुन्हेगारीची वस्तुस्थिती मांडली आहे. गंभीर स्वरूपाच्या बहुतांश गुन्ह्यांमध्ये लक्षणीय घट झाल्याचा दावा करत पुण्याला गुन्हेगारीची राजधानी म्हणणे वस्तुस्थितीला धरून नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
पुणे आणि पिंपरीतील विषारी दारू प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे मान्य करत संबंधित तीन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केल्याची माहितीही आयुक्तांनी दिली. मे २०२६ मधील दहा दिवसांतील काही गाजलेल्या घटनांमुळे शहरातील गुन्हेगारी वाढल्याचे चित्र निर्माण झाले असले तरी या स्वतंत्र घटना असून त्यातून शहरातील कायदा व सुव्यवस्थेचे चित्र दिसत नाही,
असे सांगून आयुक्त म्हणाले, राष्ट्रीय गुन्हे नोंदीच्या आकडेवारीनुसार देशातील १९ प्रमुख महानगरांमधील दखलपात्र गुन्ह्यांच्या प्रमाणात पुण्याचा क्रमांक खालच्या स्तरावर असून खुनाच्या गुन्ह्यांमध्ये शहराचा क्रमांक ११ वा आहे. वस्तुस्थितीला सोडून सोशल मीडियावर पुणे पोलिसांविषयीच्या लिखानामुळे नकारात्मक वातावरण निर्माण करणे खेदजनक असून विधायक टीकेचे आपण स्वागत करतो. मात्र, दिशाभूल करणारी माहिती नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करू शकते, असेही आयुक्तांनी म्हटले आहे.
आयुक्त म्हणतात…
१) २०२३- २०२५ मध्ये खून व खुनाच्या प्रयत्नांमध्ये २७ टक्के घट
२) साखळी चोरीत ५५ टक्के, घरफोडीत ३६ टक्के, दरोड्यात २४ टक्के, चोरीच्या घटनांत २४ टक्के घट
३) बलात्काराच्या घटनांमध्ये ७ टक्के, विनयभंगाच्या घटनांमध्ये १ टक्का घट
४) वाहन चोरीच्या गुन्ह्यांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक घट
५) दोन वर्षांत २०० मोक्का गुन्ह्यांत एक हजारांहून अधिक गुन्हेगारांवर कारवाई, २५० हून अधिकांना स्थानबद्ध
६) अंमली पदार्थविरोधी मोहिमेत २० कोटींचे अमली पदार्थ जप्त
फोन घेतला नसल्याने…
विश्वसनीय सुत्रांच्या माहितीनूसार खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्लीवरुन आयुक्तांना फोन केला होता. तसेच आमदार रोहीत पवार यांनीही आयुक्तांना फोन केला होता. मात्र, आयुक्त बैठकीत असल्याने त्यांनी हे फोन उचलले नाही. यानंतर आयुक्तांवर सुळे, पवार यांनी समाज माध्यमातून टीकेची झोड उठवली आहे..






