Amites Kumar । पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील तरुणीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या अखेर मुसक्या आवळण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांकडून प्राथमिक चौकशी सुरू आहे. यासंबंधी आज पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी माध्यमांना माहिती दिली. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाची माहिती देताना, “प्राथमिक वैद्यकीय चाचणीनुसार आरोपीच्या गळ्यावर दोरीचे व्रण आहेत, या व्रणानुसार त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, असे आरोपीने सांगितलं आहे. परंतु, दोरी तुटल्यामुळे आणि इतर लोक आल्यामुळे त्याचा जीव वाचला.” अशी महत्वाची माहिती दिली. “त्याने खरंच आत्महत्येचा प्रयत्न केला होता का याची चौकशी करण्याकरता पथक तिथे पाठवण्यात येणार आहे. परंतु प्राथमिक वैद्यकीय चाचणीनुसार त्याच्या गळ्यावर दोरीचे वळ होते”, असे आयुक्त अमितेश कुमार म्हणाले. मदत करणाऱ्या स्थानिकांचा सत्कार करणार Amites Kumar । पुढे बोलताना अमितेश कुमार यांनी, “एसटी स्थानकातील २३ सीसीटीव्ही कॅमेरा आणि स्थानकाबाहेरील ४८ सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर दीड ते दोन तासांत आम्ही आरोपीची ओळख पटवली होती. गेल्या दोन दिवसांपासून आम्ही आरोपीच्या गावात जावून शोधमोहिम घेत होतो. पण आरोपी तेव्हा सापडला नाही. अखेर तो आज सापडला आहे. याकरता मी गावातील नागरिकांचे धन्यवाद देतो. त्या गावात भेट देऊन नागरिकांचा सत्कार करणार आहोत. तिथे ज्या-ज्या लोकांनी मदत केली, त्यांचं विशेष अभिनंदन करणार आहोत”, असं पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले. शेवटची टीप देणाऱ्याला एक लाखांचं बक्षिस Amites Kumar । तसेच “शेवटच्या माहितीवरून आम्ही आरोपीला पकडलं. शेवटची माहिती आली की तो कुठेतरी पाणी पिण्यासाठी आला होता. तो कोणालातरी दिसला आणि मग तो तिथून पळाला. ड्रोनच्या सहाय्याने जी दिशा दिसली, त्यातून त्याला अटक करण्यात आली. ज्याने शेवटची माहिती दिली, त्याला एक लाखांचं बक्षिस देण्यात येणार आहे. त्याव्यतिरिक्त गावासाठी काय करता येणार, याचाही आम्ही विचार करणार आहोत”, असं अमितेश कुमार म्हणाले. आरोपीला पकडायला आम्हाला उशीर झाला, पण आज त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला आज कोर्टात सादर केलं जाणार आहे, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. दरम्यान, आरोपी दत्ता गाडे गुनाट गावातील उसाच्या शेतात लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, १०० पोलीस, ड्रोन, श्वान पथकं गावात दाखल झाले होते. २५ एकर शेतात पहाणी करुनही आरोपी न सापडल्याने तेथील शोधमोहीम काही वेळ थांबवण्यात आली. यादरम्यान, जेवण आणि पाणी नसल्याने आरोपी दत्ता गाडे कासावीस झाला होता. त्यानंतर त्याने त्याच्या नातेवाईकांच्या घरी जाऊन पाणी मागितले. त्यानंतर त्या नातेवाईकांनी पोलिसांना माहिती दिली त्यानंतर त्याला अटक करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.