कोलकता : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगाल दौऱ्यात केलेली शिष्टाई यशस्वी ठरली आहे. भाजपच्या बंगाल शाखेत घडलेले ऐक्याचे दर्शन शहांच्या दौऱ्याचे फलित मानले जात आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप घोष यांनी गुरूवारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य यांची भेट घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने सोपवलेली कुठलीही जबाबदारी सांभाळण्याची तयारी घोष यांनी संबंधित भेटीत दर्शवली. बंगालमधील भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असणाऱ्या सुवेंदू अधिकारी यांच्याशी त्यांचे सलोख्याचे संबंध नसल्याचे मानले जाते. मात्र, अधिकारी यांच्यासमवेत एकाच व्यासपीठावर येण्यास कुठलीच हरकत नसल्याची ग्वाहीही त्यांनी दिली. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या घोष यांचा मतदारसंघ वर्ष २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत बदलण्यात आला. त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यामुळे नाराजीतून ते अनेक महिने पक्षाच्या कामकाजापासून दूर राहिले. घोष आणि इतर काही नेत्यांची नाराजी आगामी निवडणूक विचारात घेता भाजपला काहीशी बॅकफुटवर नेणारी मानली जात होती. मात्र, शहांचा दौरा पक्षाच्या बंगाल शाखेला एकजूट करण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरला आहे. त्यांनी बुधवारी पक्षाचे आजी-माजी खासदार आणि आमदारांची तसेच प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. त्यामध्ये शहांनी नेत्यांचा उत्साह वाढवला. तसेच, एकजुटीची गरजही अधोरेखित केली. त्या बैठकीत सहभागी झालेल्या घोष यांनी पुढच्याच दिवशी प्रदेशाध्यक्षांची भेट घेण्याचे महत्व वाढले आहे. तृणमूल कॉंग्रेसची सत्ता असणाऱ्या बंगालमधील निवडणूक ३ ते ४ महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्या निवडणुकीत प्रमुख लढत तृणमूल आणि भाजपमध्येच अपेक्षित आहे.