Amit Shah | Narendra Modi : काश्मीरमधील हल्ल्यांच्या पाश्र्वभूमीवर पंतप्रधानांची अमित शहांशी चर्चा

Amit Shah | Narendra Modi – जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या लागोपाठच्या दहशतवादी हल्ल्यांच्या पाश्र्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठक घेतली. देण्यात आलेल्या माहितीनुसार मोदी यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याशी सविस्तर चर्चा केली तसेच जम्मू काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांच्याशीही त्यांनी बोलणी केली. काश्मीरात आता किती सैन्य तैनात आहेत आणि अचानक हल्ले कसे वाढले या अनुशंगाने ही चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.
गेल्या चार दिवसांत काश्मीरात दहशतवादी हल्ले होत असून चार वेळा चकमक झाली आहे. कठुआपासून डोडापर्यंत आणि अन्यत्र लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकी झाल्या आहेत. त्यात एक जवान शहीद झाला असून तीन दहशतवादी मारले गेले आहेत. रियासी जिल्हयात दहशतवाद्यांनी भाविकांच्या बसवर हल्ला केल्याची घटना घडल्यापासून काश्मीर खोऱ्यात तणाव वाढला आहे.
या हल्ल्याच्या अनुशंगाने असे सांगण्यात आले की भारताकडून चोख प्रत्युत्तर दिले जाईल. मात्र नेमकी काय कारवाई केली जाणार आहे याची माहिती समोर आलेली नाही. तसेच भारत कोणती मोठी तयारी करतो आहे का अशाही चर्चा त्यामुळे सुरू झाल्या आहेत.
भारतीय लष्कराकडून कोणती मोठी कारवाई केली जाईल आणि हल्ल्यानंतर भारत सरकार गप्प बसणार नाही असेही राजधानीत म्हटले जाते आहे.
यापूर्वी भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी सरकारकडूनच सर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइक केले गेले होते. त्यामुळे भाविकांच्या बसला लक्ष्य केल्यानंतर सरकार गप्प बसणार नाही अशा पोस्ट समाजमाध्यमांवरही फिरताना दिसत आहेत.
अलिकडच्या काळात जे हल्ले झाले त्यात शेजारी देश पाकिस्तानचा हात असल्याचे काही ठोस पुरावेही उपलब्ध असल्याची माहिती आहे.
हल्ल्याच्या ठिकाणी एक बॅटरी आणि पाकिस्तानात तयार केले जाणारे चॉकलेटही आढळून आल्यामुळे या संशयाला पुष्टी मिळाली आहे. तसेच दहशतवाद्यांकडून जी बंदुक जप्त करण्यात आली त्याचेही पाकिस्तान कनेक्शन उघड झाले आहे. सीमेवर युध्दबंदी असतानाही दहशतवादी भारतात प्रवेश करत आहेत यावर आता सवाल उपस्थित झाला आहे.
भारताशी समोरासमोरची थेट लढत टाळत अशा छुप्या पध्दतीने हल्ले करण्याची आणि त्यात निरपराध लोकांना लक्ष्य करण्याची जुनी पध्दत आहे. मध्यंतरी त्याला पूर्ण अटकाव करण्यात आला होता. आता ते संकट पुन्हा डोके वर काढते आहे. विरोधी पक्षांनी व विशेषत: कॉंग्रेसनेही कालच दहशतवादी हल्ल्यांचा मुद्दा उपस्थित करत मोदी यांच्यावर टीका केली होती.
दहशतवादी मोठ्या संख्येने भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याची बातमी अलिकडेच आली होती. लष्कराने घुसखोरीचे अनेक प्रयत्न हाणून पाडले असले तरी काही दशतवाद्यांना खोऱ्यात प्रवेश करण्यात यश मिळाले असल्याचे हल्ल्यांच्या घटनांवरून समजते आहे.
दरम्यान, दहशतवाद्यांच्या ठिकाणांबाबत आम्हाला काही इनपुट्स मिळाले असून लवकरच निर्णायक कारवाई केली जाईल अशी माहिती लष्करातील सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आली.





