Politics : इंडिया आघाडीत मोठी ‘फूट’, ‘या’ बड्या विरोधी पक्षातून मोदी सरकारच्या ‘डीलिमिटेशन’ला पाठिंबा
Politics : परिसीमन विधेयकाला राजदचे खासदार सुरेंद्र प्रसाद यादव आणि नेते अब्दुल बारी सिद्दीकी यांचा पाठिंबा. काँग्रेसचा विरोध; लोकसभा आणि विधानसभा जागा ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा केंद्राचा प्रस्ताव.

Politics : लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेशी संबंधित परिसीमन विधेयकावरून देशातील राजकारण तापले आहे. केंद्र सरकारला विरोधी पक्षांकडूनही पाठिंबा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बिहारमधील राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) खासदार सुरेंद्र प्रसाद यादव आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते अब्दुल बारी सिद्दीकी यांनी परिसीमनाच्या प्रक्रियेला पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, राजदने पक्षाची अधिकृत भूमिका अद्याप जाहीर केलेली नाही.
राजदचे जहानाबादचे खासदार सुरेंद्र प्रसाद यादव यांनी देशाची लोकसंख्या वाढत असल्याने परिसीमन आवश्यक असल्याचे म्हटले आहे. लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या तुलनेत लोकप्रतिनिधींवरील जबाबदारीही वाढत आहे. त्यामुळे मतदारसंघांची पुनर्रचना केल्यास नागरिक आणि लोकप्रतिनिधी दोघांनाही फायदा होईल. विकासकामांना चालना मिळेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
राजदचे ज्येष्ठ नेते अब्दुल बारी सिद्दीकी यांनीही परिसीमनाला वैयक्तिक पाठिंबा दिला आहे. मात्र, ही प्रक्रिया नियमांनुसार झाली पाहिजे. कोणत्याही पक्षाने राजकीय फायद्यासाठी मनमानी करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. या विषयावर पक्षात अद्याप चर्चा झालेली नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे दोन नेत्यांच्या समर्थनाला राजदची अधिकृत भूमिका समजणे योग्य ठरणार नाही.
खरगे यांनी विरोधकांची बैठक बोलावली –
दरम्यान, काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी २८ नोव्हेंबर रोजी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. सकाळी ११.३० वाजता दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे. परिसीमनाशी संबंधित संभाव्य विधेयकाला विरोध करण्यासाठी पुढील रणनीती ठरवण्यावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
या बैठकीस काँग्रेससह ‘इंडिया’ आघाडीतील पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. द्रमुक, आम आदमी पक्ष आणि बिजू जनता दल यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे.
काँग्रेसने केंद्र सरकारच्या भूमिकेवर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार लोकसभेत दोनतृतीयांश बहुमत मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हंटले आहे. हा संविधानावरील हल्ला असल्याचे सांगत सरकारच्या निर्णयाला ठाम विरोध करणार असल्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे.
केंद्र सरकारची ५० टक्के जागा वाढवण्याची तयारी –
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली २७ नोव्हेंबर रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत परिसीमन आणि महिला आरक्षणाशी संबंधित सुधारित विधेयकाला मंजुरी देण्यात आल्याचे वृत्त आहे. या प्रस्तावानुसार लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमधील जागा सध्याच्या संख्येपेक्षा ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्याची योजना आहे. सर्व राज्यांमध्ये जागा वाढवण्याचा समान निकष ठेवण्याचा प्रस्ताव असल्याचेही वृत्त आहे.
मात्र, मंत्रिमंडळाची मंजुरी म्हणजे विधेयक कायदा झाले असे नाही. त्यासाठी संसदेची मंजुरी आवश्यक आहे. लोकसभेची बैठक ३० नोव्हेंबरपासून, तर राज्यसभेची बैठक २ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्यामुळे या विधेयकावर संसदेत काय चर्चा होते आणि कोणते पक्ष सरकारला पाठिंबा देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
राजदचे संख्याबळ : उपलब्ध माहितीनुसार लोकसभेत राजदचे चार, तर राज्यसभेत तीन खासदार आहेत. त्यामुळे पक्षाची अधिकृत भूमिका आणि त्याच्या खासदारांची भूमिका या विधेयकाच्या मंजुरीच्या दृष्टीने महत्त्वाची ठरू शकते.





