‘अमेरिकेला सध्या सीमाविषयक सर्वात वाईट आपत्तीचा अनुभव’; डोनाल्ड ट्रम्प यांची बायडेन प्रशासनावर टीका

न्यूयॉर्क – गेल्या चार वर्षांपासून अमेरिका सीमाविषयक सर्वात वाईट आपत्तीचा अनुभव घेत आहे, अशी टीका रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. अध्यक्षपदाच्या प्रतिस्पर्धी उमेदवार कमला हॅरिस यांनी आज अमेरिका-मेक्सिको सीमेला भेट दिली. त्याचवेळी ट्रम्प यांनी ही टीका केली आहे.
हॅरिस यांच्या प्रशासनामुळे मेक्सिको सीमेची पार वाट लागली आहे, असे सांगून ट्रम्प यांनी कमला हॅरिस यांचा उल्लेख बॉर्डर झार असा केला. हॅरिस आता सीमेवर का जात आहेत? त्यांनी जे काही केले आहे, त्याचे काहीही समर्थन केले जाऊ शकत नाही.
त्या गेल्या ४ वर्षात सीमेवर का गेल्या नाहीत. त्यांच्याकडे अधिकार होते, क्षमता होती, तरी त्यांनी सीमेवरील स्थितीकडे दुर्लक्ष केले, असा आरोपही ट्रम्प यांनी केला.
चार वर्षांपूर्वी मेक्सिको सीमा सुरक्षित होती. अवैध घुसखोरांना पकडले जात होते. तस्करी थांबली होती. मात्र बायडेन प्रशासनाच्या काळात या सीमेवरील घुसखोरी वाढली असून त्यामुळे अमेरिका असुरक्षित बनली असल्याचे ट्रम्प म्हणाले.





