Ambegaon News: मुसळधार पावसाचा हाहाकार! डोंगरउतारावरील भातखाचरे उद्ध्वस्त; शेतकरी संकटात
Ambegaon News: २००९ ते २०१४ दरम्यान दिलीप वळसे पाटलांच्या प्रयत्नाने राबवलेली 'पडकई योजना' सुधारित स्वरूपात राबवण्याची मागणी.

Ambegaon News – पश्चिम आंबेगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आदिवासी भागातील भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. डोंगरउतारावरील अनेक भातखाचरे, बांधाची माती वाहून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. नुकसानग्रस्त शेती पूर्ववत करण्यासाठी शासनाने तातडीने सुधारित पडकई कार्यक्रम मंजूर करून प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी, अशी मागणी शेकऱ्यांनी केली आहे.
आदिवासी भागातील शेतकरी अत्यंत कष्टाने डोंगर उतारावर भातखाचरे तयार करतात. पूर्वी सामूहिक श्रमदानातून पडकई पद्धतीने शेती विकसित केली जात होती. मात्र, अतिवृष्टीमुळे बांध फुटल्यानंतर त्यांची दुरुस्ती करण्यासाठी मोठा खर्च येत असल्याने अनेक शेतकऱ्यांना ते शक्य होत नाही. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नामुळे सन २००९ ते २०१४ दरम्यान मृद व जलसंधारण विभागामार्फत राबविण्यात आलेल्या पडकई कार्यक्रमामुळे हजारो एकर क्षेत्र लागवडीखाली आले होते.
त्यामुळे याच धर्तीवर सुधारित शासन निर्णय काढून पुन्हा योजना सुरू करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांनी नव्या होणाऱ्या शासन निर्णयात ६० टक्के मजुरी आणि ४० टक्के यंत्रसामग्रीचा वापर करण्याची तरतूद करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे वाहून गेलेले बांध आणि भातखाचरे जलद गतीने दुरुस्त होऊन शेती पुन्हा उभी राहण्यास मदत होईल. वेळेत निर्णय न झाल्यास आदिवासी भागातील शेती आणि ग्रामीण अर्थकारणावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
“सततच्या पावसामुळे आदिवासी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने सुधारित पडकई कार्यक्रम मंजूर करून निधी उपलब्ध करावा. अन्यथा भातशेती पडीक राहून अनेक कुटुंबांवर उपासमारीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे.”
– संजय गवारी, माजी सभापती, आंबेगाव तालुका पंचायत समिती.




