Rajgad Rice Disease | रोगाने पोखरलं पिक! भातशेतीवर संकट ; कडा-करपा-तांबेराने पानं करपली

प्रभात वृत्तसेवा
विंझर – राजगड तालुक्यातील विविध गावातील भाताच्या पिकावर कडा, करपा तसेच तांबेरा रोगाची प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे पिकाची पाने करपली आहेत. यामुळे उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीने पिकावर औषधांची फवारणी करून रोगाचा प्रभाव कमी करण्याची गरज आहे. गेले काही दिवसांपासून भातपिकावर या रोगाचा प्रादूर्भाव होत असल्याने राजगड तालुक्यातील विविध गावांमधील शेतकरी हताश झाले आहेत.
सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला राजगड तालुका हा खरीप हंगामात भाताच्या पिकासाठी प्रसिद्ध आहे. तसेच राजगड तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे जीवन हे भात शेतीवरच अवलंबून असल्याने इतर काळात कोणतेही पीक राजगड तालुक्यात मोठ्या प्रमाणात घेतले जात नाही. गेली काही दिवसांपूर्वी पावसाने अचानक विश्रांती घेत कडक ऊन पडल्याने भात पिकावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होऊन काही ठिकाणी बुरशीजन्य रोगाची लागण झाली आहे.
त्यानंतर पडणारा रिमझीम पाऊस, धुके, यामुळेही पिकावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे राजगड तालुक्यातील पानशेत परिसर आणि वेल्हे परिसर यामधील काही गावांमध्ये भाताच्या पिकावर कडा, करपा, तांबेरा या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. हा रोग जीवाणूजन्य असून साधारणत फुटवे फुटणे ते लोंब्या निसवण्याच्या काळात या रोगाचा प्रादुर्भाव होतो. या रोगात सुरुवातीला पानांचे शेंडे आणि कडा फिकट हिरवट होऊन करपतात.
या रोगाचा जास्त प्रादुर्भाव झाल्यास चुडांची संपूर्ण पाने करपतात व भात पीक जागच्या जागी बसते.दरम्यान रोगाचा प्रसार लागवडीसाठी रोगग्रस्त बियाणे, रोगग्रस्त अवशेष, बांधावरील तण, वाहणारे पाणी यामधून होत असतो. या रोगामुळे पीक फुलोऱ्यात वा ओंब्या भरल्या न गेल्याने उत्पन्नात मोठी घट होण्याची भीती व्यक्त होत आहे.
नुकसान भरपाईची मागणी..
पिकांवरील रोगामुळे राजगड तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने या भागात या रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असताना कृषी विभागामार्फत कोणत्याही उपाययोजना करण्यात येत नसून शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन मार्गदर्शन केले जात नाही, असा आरोप राजगड तालुक्यातील शेतकरी करत आहेत. त्यामुळे राजगड तालुक्यातील शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे.





