Manchar : रेल्वेचा जुना मार्ग पुन्हा मंजूरीसाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा
Manchar : पुणे-नाशिक रेल्वे मार्गाच्या प्रश्नावर खेड, आंबेगाव, जुन्नर व संगमनेर रेल्वे कृती समितीची बैठक अकोले येथे झाली. यावेळी आमदार लहामटे यांची रेल्वे कृती समितीच्या पदाधिकार्यांनी भेट घेऊन अकोले, संगमनेर, आळेफाटा आणि नारायणगाव या जुन्या प्रस्तावित मार्गानेच रेल्वेची अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली.

मंचर : पुणे-नाशिक रेल्वे मार्गाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे प्रभावी पाठपुरावा करून जुन्या प्रस्तावित मार्गानेच रेल्वे सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा. मुख्यमंत्र्यांचे केंद्र सरकारमध्ये वजन असल्याने ते हा प्रश्न निश्चितच मार्गी लावतील. येत्या महिनाभरात या रेल्वेमार्गाबाबत ठोस निर्णय स्पष्ट व्हावा; अन्यथा लोकशाही मार्गाने पुढील भूमिका घेतली जाईल, असा इशारा आमदार किरण लहामटे यांनी दिला.
पुणे-नाशिक रेल्वे मार्गाच्या प्रश्नावर खेड, आंबेगाव, जुन्नर व संगमनेर रेल्वे कृती समितीची बैठक अकोले येथे झाली. यावेळी आमदार लहामटे यांची रेल्वे कृती समितीच्या पदाधिकार्यांनी भेट घेऊन अकोले, संगमनेर, आळेफाटा आणि नारायणगाव या जुन्या प्रस्तावित मार्गानेच रेल्वेची अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली. या बैठकीला पुणे-नाशिक रेल्वे संघर्ष कृती समिती, खेडचे उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, अकोले समितीचे कार्याध्यक्ष संतोष फापाळे, दत्ता ढगे, राहुल ढेबरे आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार लहामटे म्हणाले की, पुणे-नाशिक रेल्वेची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. सुरुवातीला रेल्वेमार्ग मंजूर झाल्यानंतर नारायणगावमार्गे जागा आरक्षित करण्यात आल्या होत्या. मात्र, जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी) प्रकल्पामुळे या मार्गात अडथळा निर्माण झाल्याने रेल्वेमार्ग शिर्डीमार्गे वळविण्यात आला. या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी असून, त्याविरोधात विविध आंदोलनेही झाली आहेत.
मागील अधिवेशनात मुख्यमंत्र्यांसोबत या विषयावर बैठक झाली होती. मात्र, त्यात नेमका काय निर्णय झाला, याची माहिती आगामी हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांकडून घेणार आहे. तसेच खासदारांनी रेल्वेमंत्र्यांसोबत स्वतंत्र बैठक घेऊन या प्रश्नावर ठोस निर्णय घ्यावा. जुन्या मार्गाने रेल्वे सुरू करण्याची मागणी मान्य झाल्यास सरकारचे स्वागत केले जाईल; मात्र निर्णय न झाल्यास लोकशाही मार्गाने पुढील भूमिका ठरविण्यात येईल, असेही लहामटे यांनी स्पष्ट केले.





