Pune District : अध्यापनात आधुनिक तंत्रज्ञान, एआयचा वापर करा -रूपाली धोका
Pune District : दहा दिवसांच्या या प्रशिक्षणात वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी 72, तर निवड वेतनश्रेणीसाठी 81 असे एकूण 153 शिक्षक सहभागी झाले आहेत. शिक्षणविस्तार अधिकारी शैला निमसे आणि संचिता अभंग यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका समन्वयक परमेश्वर काकडे व ज्योत्सना माशेरे नियोजन करीत आहेत.

मंचर : बदलत्या शैक्षणिक परिस्थितीत शिक्षकांनी नवनवीन ज्ञान आणि तंत्रज्ञान आत्मसात करून अध्यापन अधिक प्रभावी करावे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी करताना कृत्रिम बुद्धिमत्ता, आधुनिक तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण अध्यापन पद्धतींचा वापर करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधावा, असे आवाहन आंबेगाव तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी रूपाली धोका यांनी केले.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मंचर येथील महात्मा गांधी विद्यालयात वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षण वर्गाला भेट देऊन धोका यांनी शिक्षकांशी संवाद साधला.
दहा दिवसांच्या या प्रशिक्षणात वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी 72, तर निवड वेतनश्रेणीसाठी 81 असे एकूण 153 शिक्षक सहभागी झाले आहेत. शिक्षणविस्तार अधिकारी शैला निमसे आणि संचिता अभंग यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका समन्वयक परमेश्वर काकडे व ज्योत्सना माशेरे नियोजन करीत आहेत.
सुलभक नारायण गोरे, योगेश देशमुख, तुषार शिंदे, संतोष शिंदे, नीलिमा वळसे पाटील, भगवान भोर, दत्तात्रय आहिरे, सुदाम जोशी, नारायण चित्ते, इंद्रभान भोर आणि सचिन रोडे शिक्षकांना मार्गदर्शन करीत आहेत. प्रशिक्षणात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, संगणकीय सादरीकरण, व्हिडिओ निर्मिती, लेखी स्वाध्याय, कृती संशोधन आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यावर भर दिला जात आहे.





