Ambegaon News: कोथिंबीर पिवळी पडली, कोबीवर ‘घाण्या’ रोग! पालेभाजी उत्पादकांवर आले मोठे आर्थिक संकट
Ambegaon News: सततच्या रिमझिम पावसाने आणि सूर्यप्रकाशाच्या अभावाने पालेभाज्यांवर रोगांचा प्रादुर्भाव; महाळुंगे पडवळ, साकोरेसह अनेक गावांतील कोबीचे पीक नष्ट.

Ambegaon News – आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे कोबीसह पालेभाज्यांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. महाळुंगे पडवळ, साकोरे, चास, गिरवली परिसरात कोबी पिकावर ‘घाण्या’ रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने काढणी योग्य पीक सडून गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
तातुक्याच्या पूर्व भागात बारमाही पाण्याची उपलब्धता असल्याने जमिनीत मोठ्या प्रमाणात ओलावा आहे. त्यातच गेल्या महिनाभरापासून अधूनमधून रिमझिम पाऊस सुरू असल्याने शेतजमिनी सतत ओलसर राहत आहेत. अनेक दिवस सूर्यदर्शन झाले नसल्याने पिकांना आवश्यक सूर्यप्रकाश मिळत नाही. परिणामी पिकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
रांजणी, वळती, जाधववाडी, थोरांदळे परिसरात कोबी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोबी पिके सडून गेल्याने शेतकऱ्यांना ती शेतातून काढून टाकण्याची वेळ आली आहे. कोबी पिकासाठी बी-बियाणे, खते, औषधे तसेच मशागती आणि मजुरीवर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. मात्र, काढणीच्या वेळीच पीक सडल्याने केलेला भांडवली खर्चही वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
याबाबत शेतकरी महेश कुंडलीक जाधव म्हणाले, “सततच्या पावसामुळे कोबी व इतर पालेभाजीवर्गीय पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. प्रतिकूल हवामानातही चांगली वाढ होईल आणि रोगांना प्रतिकार करणाऱ्या वाणांची निर्मिती करणे गरजेचे आहे. अन्यथा शेतकऱ्यांना दरवर्षी मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागेल.”
कोथिंबिरीलाही पावसाचा फटका
कोथिंबीर उत्पादक शेतकरी अमर जाधव म्हणाले, “सततच्या पावसामुळे कोथिंबीर पिवळी पडत आहे. काढणीयोग्य झालेली कोथिंबीर बाजारात मातीमोल भावाने विकावी लागत आहे. अनेक वेळा उत्पादनातून भांडवली खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे पालेभाजी उत्पादकांपुढे मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे.”





