Ambegaon Crime: शेतीच्या वादातून दोन कुटुंबांत तुंबळ हाणामारी; दगडफेक आणि मारहाणीत ७ जणांवर गुन्हा
Ambegaon Crime: आंबेगाव तालुक्यातील तिवलदरा (घोडेगाव) येथे शेतात सोयाबीन पेरणी करताना दोन गट भिडले; स्वप्नील भास्कर काळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल.

Ambegaon Crime – आंबेगाव तालुक्यातील तिवलदरा (घोडेगाव) येथे शेतीच्या मालकीच्या वादातून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात दगडफेक, काठ्यांनी मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घोडेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील भास्कर काळे (वय ३९, रा. इंदोरी, ता. मावळ, मूळ रा. घोडेगाव) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
स्वप्नील काळे व त्यांचे सहकारी बुधवार, दि.१७ रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास गट क्रमांक ३१४ मधील शेतात सोयाबीन पेरणीसाठी गेले होते. त्यावेळी आरोपींनी संबंधित जमीन स्वतःची असल्याचा दावा करत वाद घातला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर आरोपी किसन बबन काळे याने मोठा दगड उचलून स्वप्नील काळे यांच्या डोक्यात मारल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसेच इतर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी व हाताने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
यावेळी दिनेश नानेकर व बालाजी शेळके यांनाही झाडांच्या फांद्यांनी मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, तक्रार देण्यासाठी घोडेगाव पोलीस ठाण्याकडे निघालेल्या भास्कर खंडू काळे यांना आरोपींनी कॅनॉलच्या पुलाजवळ अडवून मारहाण केली. तसेच पोलीस ठाण्यात गेल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणी चंद्रकांत काळे, किसन काळे, सार्थक काळे, सोहम भासकर, आदित्य भगत, क्षितीज काळे आणि अरुणा काळे (सर्व रा. घोडेगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास घोडेगाव पोलीस करीत आहेत.





