Ghodegaon ITI Student Murder : घोडेगाव आयटीआय वसतिगृहात विद्यार्थ्याचा खून! नंतर सोशल मीडियावर ‘वन मॅन शो’ स्टेटस टाकून दहशत
Ghodegaon ITI Student Murder : घोडेगाव पोलिसांकडून सोशल मीडियावरील स्टेटसची स्वतंत्र चौकशी सुरू; विद्यार्थ्याच्या हत्येने आंबेगाव तालुका हादरला.

Ghodegaon ITI Student Murder – आंबेगाव तालुक्यातील घोडेगावजवळील गोनवडी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय)च्या मुलांच्या वसतिगृहात विद्यार्थ्याच्या खुनाची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. 5) पहाटे उघडकीस आली. या घटनेनंतर आरोपीने सोशल मीडियावर कथितपणे वन मॅन शो कसा ठोकला अशा आशयाचे स्टेटस टाकून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आल्याने प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे.
सौरभ संतोष साखरे (वय 23) हा विद्यार्थी वसतिगृहाच्या टेरेसवर झोपलेला असताना त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. झोपेत असतानाच त्याच्या डोक्यावर लोखंडी पाईप तसेच सिमेंटच्या गट्ट्याने वार करण्यात आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी अमय भिका कोकरे (वय 19) या विद्यार्थ्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
प्राथमिक तपासात पूर्वी झालेल्या भांडणाचा तसेच अनिरुद्ध साखरे याच्यासोबत झालेल्या वादाचा राग मनात धरून आरोपीने हा हल्ला केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, खुनानंतर आरोपीने सोशल मीडियावर वन मॅन शो कसा ठोकला अशा आशयाचे स्टेटस ठेवून स्वतःची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांच्या निदर्शनास आली आहे. या स्टेटसमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांकडून या बाबीचीही स्वतंत्र चौकशी केली जात आहे.





