Ambegaon Crime – आंबेगाव तालुक्यातील कोलतावडे परिसरात विनापरवाना वृक्षतोड व अवैध लाकूड वाहतुकीप्रकरणी वनविभागाने कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. २७९ साग झाडांची तोड केल्याचे उघड झाल्याने २ लाख ७९ हजार रुपये दंड करण्यात येणार असल्याचे घोडेगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी कुणाल लिमकर यांनी सांगितले. वनपरिक्षेत्र घोडेगाव अंतर्गत मौजे कोलतावडे (ता.आंबेगाव) येथे अवैध वृक्षतोड झाल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर फिरते पथक पुणे, वनपरिक्षेत्र अधिकारी घोडेगाव, क्षेत्रीय कर्मचारी तसेच तक्रारदार यांच्या उपस्थितीत घटनास्थळी संयुक्त पाहणी करण्यात आली. या पाहणीत दुर्गा शेळके, शंकर लोहकरे, विठ्ठल शेळके आणि चिमा शेळके यांनी आरोपी सुभाष विठ्ठल कोकणे (वय ४५, रा.महाळुंगे सुपेधर, ता. आंबेगाव) याच्याकडून महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम १९६४ अंतर्गत नोंद असलेल्या साग प्रजातीच्या झाडांची विनापरवाना तोड करून लाकूड अवैधरित्या वाहतूक केल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला. तपासात एकूण २७९ साग झाडांची तोड झाल्याचे समोर आले असून त्यापैकी १३८ झाडे मागील काही महिन्यांत तोडल्याचेही आढळून आले आहे. तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन, पुणे यांच्या समवेत वनपरिक्षेत्र अधिकारी घोडेगाव यांनी पुढील तपास करत विनापरवाना तोड केलेल्या साग लाकडाचा माल जप्त केला. यात मौजे गोहे खुर्द येथून ८७ नग, महाळुंगे तर्फे घोडा येथून ३२ नग तसेच कोलतावडे परिसरातून ५७ नग असे एकूण १७६ नग लाकूडमाल हस्तगत करण्यात आले. या प्रकरणात राखीव वनक्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारची वृक्षतोड झालेली नसल्याचे स्पष्ट झाले असून पुढील तपास घोडेगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी कुणाल लिमकर करत आहेत.