Junnar News : वणवा लावताना रंगेहात पकडले! जुन्नरच्या जंगलात वनविभागाचा थरारक पाठलाग..पहा काय घडलं?
Junnar News : जुन्नर तालुक्यातील डोंगररांगांना जाणीवपूर्वक आग लावण्याचे प्रकार वाढले; वनविभागाच्या सतर्कतेमुळे मांगणेवाडीत दोन आरोपींना अटक.

Junnar News – उन्हाळ्याची तीव्रता दिवसागणिक वाढत असून निसर्गात मोठ्या प्रमाणात पानगळ होत आहे. कडक उन्हापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी पशुपक्षी आणि वन्यप्राणी वनविभागातील झाडांचा व गवताचा आधार घेत आहेत. मात्र, जुन्नर तालुक्यातील विविध डोंगरांना जाणीवपूर्वक आग लावण्याचे प्रमाण वाढल्याने पर्यावरण प्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर, जुन्नर वनविभागाने डोंगरांना आग लावणाऱ्यांविरुद्ध धडक मोहीम सुरू केली असून शनिवारी (दि. ७) मांगणेवाडी (खामगाव) येथील राखीव वनक्षेत्रात वणवा लावणाऱ्या दोन जणांना अटक केली आहे. जुन्नर वनविभागाचे वनपाल आलमे आणि त्यांचे पथक गस्तीवर असताना सायंकाळी सातच्या सुमारास मांगणेवाडी येथील वन कक्ष क्रमांक ८४ मध्ये ठिकठिकाणी वणवा लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
वनपाल आलमे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता चार व्यक्ती राखीव वनक्षेत्रात आग लावताना दिसून आल्या. त्यातील दोन जण डोंगराच्या वरच्या भागात खामगाव मांगणेवाडीकडून माणिकडोहच्या दिशेने वणवा लावत जात होते, तर अन्य दोघे डोंगराच्या पायथ्याशी आग लावत होते. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शिताफीने पाठलाग करून करण हरीभाऊ पारधी आणि अक्षय संतोष जाधव यांना पकडले.
अन्य दोन आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. पकडलेल्या आरोपींना जुन्नर न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पुण्याचे वनसंरक्षक आशिष ठाकरे, उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, लोकेश पाटील, अमृत शिंदे, स्मिता राजहंस, प्रदीप चव्हाण आणि त्यांच्या पथकाने केली.
“शासकीय राखीव वनात अपप्रवेश करणे किंवा वनास आग लावणे हा अजामीनपात्र गुन्हा आहे. अशा कृत्यासाठी दोन वर्षांपर्यंतचा कारावास आणि दहा हजार रुपयांच्या दंडाची तरतूद भारतीय वन अधिनियमात आहे.”
– प्रदीप चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी, जुन्नर.
ट्रॅप कॅमेरे आणि ड्रोनची करडी नजर
जुन्नर वनविभागांतर्गत येणाऱ्या जुन्नर, आंबेगाव, शिरूर आणि खेड तालुक्यात वैविध्यपूर्ण वनसंपदा आहे. वणव्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी वनविभागाने आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. वनक्षेत्रात ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले असून ड्रोन सर्वेक्षणाच्या माध्यमातून डोंगररांगांवर नजर ठेवली जात आहे. वनक्षेत्रात जाणीवपूर्वक आग लावणाऱ्या व्यक्तींची माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे संकेत प्रशासनाने दिले आहेत. तसेच नागरिकांनी वनसंपदेच्या रक्षणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन वनविभागामार्फत करण्यात आले आहे.





