Pune District : नाटंबीमध्ये विनापरवानगी वृक्षतोड; ग्रामस्थांच्या तक्रारीला वनविभागाची केराची टोपली

भोर : भोर-आंबवडे रस्त्यावरील नाटंबी (ता. भोर) गावात विनापरवानगी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. गावातील पद्मावती देवस्थान ट्रस्टच्या गट क्रमांक ४९५ मध्ये ही वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. याठीकाणी सुमारे साडेचार एकर जागेत औषधी वनस्पती व फळबाग लागवड करण्याचे नियोजन आहे. विशेष म्हणजे ही झाडे दिवसाढवळ्या तोडून, तोडलेले लाकूड टेम्पोमधून बाहेर नेण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह :
याप्रकरणी ग्रामस्थांनी २४ नोव्हेंबर रोजी भोर वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाकडे तक्रार दाखल केली होती. मात्र दीड महिना उलटूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तक्रारदारांच्या मते, तोडलेली झाडे पाच ते पस्तीस वर्षे जुनी असून त्यांचा घेरा १५ ते १५० सेंटीमीटर इतका आहे. सर्व तोडलेल्या झाडांच्या बुंध्यांवर ऑइल पेंटने क्रमांक टाकलेले आढळून आले आहेत.
अहवालाद्वारे बचाव :
दरम्यान, वनपाल एस. एल. मुंढे यांनी केलेल्या पाहणीत केवळ ४९ झाडांची तोड झाल्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालात लिंब, ऐन, दाबण, तोरण, पांगारा, शिवण, करंज, वरस, जांभूळ आदी जातींच्या झाडांचा समावेश असून झाडांचा घेरा १४ ते ५२ सेंटीमीटर इतका असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ही वृक्षतोड अवैध असून नंतर परवानगीसाठी अर्ज केल्याचेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, या अहवालानंतरही कोणतीही दंडात्मक किंवा कायदेशीर कारवाई झाली नसल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.
रात्रीच्या खेळाकडे वनविभागाचे दुर्लक्ष :
भोर तालुक्यात विसगाव, हिरडस मावळ, वेळवंड, भुतोंडे खोरे तसेच महामार्ग परिसरातही अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू असल्याचे दिसून येत आहे. .दिवसा झाडांची तोड केली जाते.अन रात्री अकरानंतर टेम्पो, ट्रॉलीतून त्याची वाहतूक केली जाते. त्याचे फोटो, व्हीडीओ चित्रीकरण काही वन्यप्रेमींनी केले आहे. ते समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. वनविभागाच्या दुर्लक्षामुळे अशा घटना वाढत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दरम्यान दोन दिवसापूर्वी चौपाटी येथील श्री. छत्रपती शिवाजी पुतळ्याजवळ एका टेम्पोतून जळाऊ लाकूड नेताना आढळला. पाठलाग करून टेम्पो पकडला व त्याच्यावर कारवाई केल्याचे वनविभागाने सांगितले.
तक्रारदारांच्या अर्जानंतर नाटंबी येथील पुढील वृक्षतोड थांबवण्यात आली असून, घटनास्थळाची पाहणी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल.
शिवाजी राऊत, वनपरिक्षेत्र अधिकारी, भोर





