अंबा बैसली सिंहासनी हो।।

पुणे – आश्विन शुद्ध प्रतिपदा अर्थात घटस्थापना-शारदीय नवरात्रौत्सवाची सुरुवात. यादिवशी घरोघरी आणि सार्वजनिकरित्या घटस्थापना केली जाते. या पावन पर्वाची यंदा रविवारपासून सुरुवात झाली. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत मुहूर्तावर घटस्थापना करून या नवरात्रीला सुरुवात करण्यात आली. आता पुढील नऊ दिवस आदिशक्तीचा जागर केला जाणार आहे.
दरम्यान, ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी, चतु:शृंगी, सारसबागेजवळील महालक्ष्मी आणि शहरातील अन्य प्रसिद्ध देवींच्या मंदिरांमध्येही मान्यवरांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. यावेळी देवीची यथासांग पूजा करण्यात आली. घरोघरी घट बसवल्यानंतर मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या.
संपूर्ण दहा दिवस घरोघरी उत्सवाचे वातावरण असतेच; परंतु शहरातील मंदिरांमध्ये पहाटेपासूनच भाविकांची गर्दी पहायला मिळते. छबिना, पालखी, भोंडला, महिला भगिनींसाठी विविध उपक्रम, खेळ, गरबा, दांडिया यासारख्या उपक्रमांनी हा उत्सव सजवला जातो. त्याचीही तयारी सार्वजनिक मंडळांनी केली आहे.
बाजारपेठाही फुलल्या
गणेशोत्सव संपला की या शारदीय नवरात्रौत्सवाचे वेध लागतात त्यामुळे महोत्सव सुरू होण्याच्या तीन-चार दिवस आधीच खरेदीची, तयारीची लगबग सुरू होते.घटस्थापनेसाठी लागणारी वाळू, माती, पंचधान्य, पाने, फुले, पाच फळे या सगळ्याची उपलब्धता बाजारपेठेत दिसून येते. यंदाही बाजारपेठ फुलल्याचे दिसून आले.





